मुंबई -शनिवारी रात्री उशीरा एनसीबीच्या पथकाकडून डोंगरी आणि अंधेरीमध्ये छापेमारी करण्यात आली. या छाप्यांमध्ये दोन अमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली आहे. तसेच अमली पदार्थांचा साठा देखील जप्त करण्यात आला. इब्राहिम कासकर आणि आसिफ राजकोटवाला असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
इब्राहिम कासकर 'मर्सिडीज'मधून करायचा अमली पदार्थांची तस्करी
एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार आरोपी इब्राहिम कासकर हा आपल्या 'मर्सिडीज'मधून अमली पदार्थांची तस्करी करायचा, कासकरने चौकशीत दिलेल्या माहितीच्या आधारे एनसीबीने आणखी तीन ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीमध्ये अमली पदार्थांची तस्करी करणारा दुसरा आरोपी आसिफ राजकोटवाला याल अटक करण्यात आली आहे.
इब्राहिम कासकर हा आपण दाऊद इब्राहिमचा भाऊ असल्याचे सांगायचा
आरोपी इब्राहिम कासकर हा आपण दाऊद इब्राहिमचा भाऊ असल्याचे सांगायचा, यामुळे परिसरात त्याची दहशत निर्माण झाली होती. यापूर्वी देखील दोन गुन्ह्यांमध्ये त्याला अटक करण्यात आली होती, अशी माहिती यावेळी एनसीबीच्या वतीने देण्यात आली.