मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) सुशांत सिंग राजपूत प्रकरणी ड्रग्स सिंडिकेट समोर आल्यानंतर, याबाबत तपास करत असताना यामध्ये काही टीव्ही कलाकारांची नावेही समोर आली आहेत. त्यामुळेच आज 'एनसीबी'कडून मुंबईतील अंधेरी परिसरात तीन टीव्ही कलाकारांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. दरम्यान, आज एनसीबी ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री रकुल प्रीत हिची चौकशी करणार आहे. चौकशीसाठी ती कार्यालयात दाखल झाली आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून जया सहा आणि श्रुती मोदी या दोघांची चौकशी केल्यानंतर त्यांच्या काही डिलिट केलेले व्हाट्सअप चॅट पुन्हा रिकव्हवर करण्यात आले होते. हे व्हाट्सअप चॅट जया सहाला दाखवल्यानंतर यामध्ये काही टीव्ही कलाकार यांचाही समावेश असल्याचं समोर आले होते. यामध्ये क्षितिज रामप्रसाद, अबीगल पांडे आणि सनम जोहर या तीन टीव्ही कलाकारांचा समावेश आहे.
एनसीबीचे मुंबईतील टीव्ही कलाकारांच्या घरी छापे; तर रकुल प्रित सिंग चौकशीसाठी कार्यालयात दाखल
क्षितिज प्रसाद ताब्यात..
एनसीबीने आपल्या कारवाईदरम्यान चौकशीसाठी क्षितिज प्रसादला ताब्यात घेतले आहे. धर्मा प्रोडक्शनचा प्रमुख करण जोहर याच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये प्रसाद हा एक्झिक्युटिव्ह प्रॉडक्शनचे काम पाहत होता.
दीपिकासोबत मलाही चौकशीला येऊद्या - रणवीर सिंह
ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूडमधील दीपिका पदुकोनसह इतर मोठ्या अभिनेत्रींची नावेही समोर आली आहेत. याचप्रकरणी एनसीबीकडून उद्या (शनिवार) दीपिकाची चौकशी करण्यात येणार आहे. 26 सप्टेंबर रोजी दीपिका पदुकोण ही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहणार असून, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीपिका पदुकोणचा पती रणवीरने सुद्धा या चौकशी दरम्यान दीपिकासोबत हजर राहण्याची विनंती केली आहे. मात्र यावर अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याचे एनसीबीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.