मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबईतील अंधेरी परिसरातील वीरा देसाई रोड येथे करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान एका अमली पदार्थ तस्कराला अटक करण्यात आली असून या कारवाईदरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा एक अधिकारी जखमी सुद्धा झाला आहे.
अडीच किलोमीटरपर्यंत एनसीबीने केला पाठलाग
एनसीबीला मिळालेल्या माहितीवरून 20 मे रोजी मुंबईतील अंधेरी परिसरातील वीरा देसाई रोड येथे 3 अमली पदार्थ तस्कर हे अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एनसीबीकडून सापळा रचण्यात आला होता. एका दुचाकीवर आलेल्या 3 अमली पदार्थ तस्करांना पकडण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी गेले असता दुचाकीवरून हे तिघेही पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. जवळपास अडीच किलोमीटरपर्यंत एनसीबीने पाठलाग केला. त्यानंतर यापैकी एकाला पकडण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा अधिकारी गेला असता त्यास दुचाकीवरून जवळपास 200 मीटर फरफटत या आरोपीने नेले. या घटनेत एनसीबीचा अधिकारी जखमी झाला आहे.
दोघे पळून जाण्यात यशस्वी
यादरम्यान 3 पैकी 2 अमली पदार्थ तस्कर पळून जाण्यात यशस्वी झाले असून एका अमली पदार्थ तस्कराला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली आहे. आरोपीकडून 62 ग्राम पेट्रोल पदार्थ जप्त करण्यात आले आहे.