मुंबई - क्रूझ ड्रग्ज प्रकरणात ( Cruise Drugs Case ) शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ( Aryan Khan ) मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. या विरोधात आता सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी NCB ने सुरु केली आहे. या प्रकरणातील हायकोर्टाच्या सविस्तर निर्णयाची वाट पाहत असून, जामीनाचे आदेश मिळाल्यानंतर सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरु असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. २ ऑक्टोबरला क्रूझवरील छापेमारीवेळी आर्यन आणि त्याच्या साथीदारांना एनसीबीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर २८ ऑक्टोबरला मुंबई हायकोर्टाने आर्यन आणि त्याच्या साथीदारांना जामीन मंजूर केला आहे.
उच्च न्यायालय म्हणाले होते -
मुंबई हायकोर्टाने आर्यन, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धनेला या तिघांना जामीन मंजूर केला. त्यानंतर शनिवारी मुंबई हायकोर्टाकडून या प्रकरणातील सविस्तर बेल ऑर्डर जारी करण्यात आली आहे. यात आर्यन खानविरोधात एनसीबीकडे कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. आर्यन आणि इतर कथित आरोपींनी एकत्र ड्रग्ज घेण्याबाबत कोणताही कट रचल्याचे पुरावे नसल्याचेही या सविस्तर ऑर्डरमध्ये नमूद करण्यात आले आहे. आर्यन खान याच्या व्हॉट्सअप चॅटलाही पुरावे म्हणून फारसे महत्त्व देण्यात आलेले नाही. फक्त एकत्र प्रवास केला आणि एकाचवेळी ते तिघेही क्रूझवर उपस्थित होते, याशिवाय कटाचा कोणताही आरोप या तिघांविरोधात सिद्ध करता आलेला नाही.
'व्हॉट्सअॅप चॅट्समध्ये काहीही आक्षेपार्ह नाही'
मुंबई उच्च न्यायालयाच्या १४ पानांच्या सविस्तर आदेशात प्रथमदर्शनी आर्यन खान आणि इतर आरोपींविरुद्ध असा कोणताही सकारात्मक पुरावा आढळून आलेला नाही की त्यांनी गुन्हा करण्याचा कट रचला होता असे म्हटले आहे. आर्यन खानच्या मोबाईलवरून घेतलेल्या व्हॉट्सअॅप चॅट्समध्ये इतर आरोपींनी गुन्हा करण्याचा कट रचला होता असे दाखवण्यासाठी काहीही आक्षेपार्ह आढळले नाही असे न्यायालयाने म्हटले.