मुंबई -आर्यन खान ड्रग्स प्रकरणी पंच असलेल्या प्रभाकर साईल याने हे प्रकरण दाबण्यासाठी डील झाल्याचा आरोप केला आहे. झोनल डायरेक्टर समीर वानखडे यांनी हे आरोप फेटाळले असून यांच्या सखोल चौकशीसाठी साईल यांचे प्रतिज्ञापत्र एनसीबीच्या डायरेक्टरकडे चौकशीसाठी पाठवले असल्याचे एनसीबीचे डेप्युटी डायरेक्टर मुथा अशोक जैन यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून कळविले आहे. यामुळे समीर वानखडे हे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एनसीबीने जारी केलेले स्पष्टीकरण प्रतिज्ञापत्र चौकशीसाठी -
प्रभाकर साईल याच्या आरोपानंतर एनसीबीचे झोनल डेप्युटी डायरेक्टर मुथा अशोक जैन यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढले आहे. त्यात प्रभाकर साईल यांनी त्यांना जे काही बोलायचे आहे ते कोर्टात बोलावे, सोशल मीडियावर बोलू नये असे म्हटले आहे. एनसीबीचे डायरेक्टर समीर वानखडे यांनी साईल याने केलेले आरोप फेटले आहेत. मात्र तरीही प्रभाकर साईल यांचे प्रतिज्ञापत्र एनसीबीचे डायरेक्टर यांच्याकडे चौकशीसाठी पाठवण्यात आले आहे, असे एनसीबीने पत्रकात म्हटले आहे. वानखडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाप्रकरणीचे प्रतिज्ञापत्र एनसीबीकडे चौकशीसाठी पाठवण्यात आल्याने याप्रकरणी चौकशी झाल्यास वानखडे हे अडचणीत येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
प्रकरण दाबण्यासाठी २५ कोटींची डील -
कार्डीला क्रूझवर ड्रग्स पार्टी प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट याच्या सह आठ जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी आर्यन खानचे प्रकरण दाबण्यासाठी २५ कोटी रुपयांचा डील करण्यात आली होती. मात्र नंतर १८ कोटीवर डील फायनल झाली. त्यातले ८ कोटी समीर वानखेडेंना दिले जाणार होते, असा गंभीर आरोप प्रभाकर साईलने केला आहे. के पी गोसावीच्या सांगण्यावरून साईलने ५० लाख रुपये कलेक्ट केल्याचा खुलासा केला आहे. या ५० लाखांतले ३८ लाख रुपये सॅम डीसोझाला दिल्याचा दावा देखील व्हिडिओमध्ये केला आहे. प्रभाकरने स्वतःचा व्हिडिओ व्हायरल करून याप्रकरणातील मोठा गौफ्यस्फोट केला आहे. यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कॉर्डिया द क्रूझवर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने २ ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास कारवाई करत १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी (मेफोड्रोन), २१ ग्रॅम चरस आणि २२ एक्स्टसीच्या गोळ्या आणि १.३३ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा या आठ जणांना ताब्यात घेतले आहे. यामधील आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा या तीन जणांना ३ ऑक्टोबरला न्यायालयात हजार केले असता त्यांना एका दिवसाची एनसीबी कोठडी देण्यात आली होती. ४ ऑक्टोबरला पुन्हा या तीन जणांना तसेच इतर पाच जणांना अशा एकूण आठ जणांना न्यायालयात हजार केले असता ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली होती. ७ ऑक्टोबरला आर्यन खानसह आठ आरोपीना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी अद्याप २० जणांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा -Aryan Khan Case -आर्यनच्या सुटकेसाठी 25 कोटींचा सौदा, ड्रग्ज पार्टी प्रकरणातील 'पंच'चा गौप्यस्फोट