मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात शौविक चक्रवर्तीसह इतर काही आरोपींच्या जामीनाला नर्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मुंबई सत्र न्यायालयातील एनडीपीएस न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करण्याची मागणी एनसीबीकडून करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात 30 मार्चला सुनावणी होणार आहे.
12 हजार पानांचे आरोपपत्र..
सुशांतसिंग राजपूत संबंधित ड्रग्स प्रकरणात याआधी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने विशेष एनडीपीएस न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. अभिनेता रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ आणि इतर आरोपी या प्रकरणात आरोपी आहेत. 12,000 पानांच्या आरोपपत्रात रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक तसेच अन्य 31 आरोपींचा समावेश आहे. त्यात मुंबईतील काही ड्रग पेडलर्सचा समावेश आहे.
आरोपपत्रात आरोपी म्हणून रियाच्या ओळखीतील ड्रग पेडलर्सची नावे आणि अनेक ड्रग पुरवठा करणारेही समाविष्ट आहेत. या सर्वांना एनसीबीने अटक केली होती. ड्रग्ज जप्त केल्याचा आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केल्याचा अहवाल, फॉरेन्सिक अहवाल, तसेच साक्षीदारांच्या निवेदनांच्या आधारे ही आरोपपत्र तयार करण्यात आले आहे. मोबाईल फोन आणि संगणक या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची फॉरेन्सिक तपासणी आणि साक्षीदारांच्या निवेदनाच्या आधारे एनसीबीने अमली पदार्थांच्या प्रकरणात दोषारोपपत्र तयार केले आहे. या आरोपपत्रासंदर्भात एनसीबीचे विभागीय संचालक समीर बनखेडे न्यायालयात दाखल झाले होते.
गेल्या वर्षी झाली होती अटक आणि सुटका..
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणात एनसीबीने अमली पदार्थांशी संबंधित दोन गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांना ब्युरोने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अटक केली होती. परंतु नंतर न्यायालयाने त्यांना जामिनावर मुक्त केले होते.
हेही वाचा :सचिन वाजे प्रकरण : मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्यात बैठक