मुंबई- राज्य अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर विरोधी पक्षातील भाजप नेते आक्रमक झाले आहेत. नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सौमेय्या यांनी केली आहे. आज (गुरुवार) सकाळी एनसीबीने बांद्रा येथील समीर खान यांच्या निवासस्थानी छापा टाकला. सोबतच मुंबईतील अनेक ठिकाणी एनसीबीने छापा टाकले.
समीर खान आणि करण सजनानीत पैशाचा मोठा व्यवहार -
एनसीबी अधिकारी अटकेची माहिती देताना समीर खानने अमली पदार्थांचा व्यवहार केल्याची तसेच ड्रग्जचे सेवन केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. करण सजनानी आणि समीर खानमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार झाल्याची माहिती समोर येत आहे. आधी फक्त २० हजारांचा व्यवहार झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र, यापेक्षा मोठा व्यवहार असल्याची माहिती आता पुढे येत आहे.
भाजपचे नेते किरीट सौमेय्या यांनी ट्विट करून केंद्रीय मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मालिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो एनसीबीने अटक केली आहे. आता सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा दिला पाहिजे.
नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी एनसीबीकडून ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समीर खान यांना बुधावरी सकाळी बोलविण्यात आले. एनसीबी ड्रग्स प्रकरणात नवीन लोकांना चौकशीसाठी बोलवित आहेत. आवश्यकता असल्यास अनेक हायप्रोफाइल व्यक्तींचीही चौकशी करण्यात येत आहे. एनसीबीने समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्कर करण सजनानी यांची चौकशी केल्यानंतर एनसीबीने समीर खानला चौकशीसाठी समन्स पाठविले.
कोण आहेत समीर खान?
समीर खान हे राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे जावई आहेत. नवाब मलिक हे महाराष्ट्र सरकारमधील अल्पसंख्याक कार्य व कौशल्य विकास मंत्री आहेत.
अमली पदार्थ तस्करी प्रकरणात नवाब मलिक यांच्या जावायाला अटक समीर खान यांना उद्या न्यायालयात करण्यात येणार हजर
समीर खान यांना उद्या मुंबईतील न्यायालयात हजर केले जाईल. यापूर्वी एनसीबीने चौकशीसाठी त्यांना समन्स पाठविले होते. समीरचे नाव ड्रग पेडलर करण सजनानीच्या चौकशीनंतर समोर आले.
ऑनलाईन व्यवहाराने खान सापडले एनसीबीच्या जाळ्यात
दक्षिण मुंबईतील बल्लार्ड इस्टेट येथील एनसीबी कार्यालयात आज सकाळी दहाच्या सुमारास खान पोहोचले. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आणि त्यादरम्यान 20,000 रुपयांचा ऑनलाईन व्यवहार केल्यावर समीर खानला एनसीबीने समन्स बजावले. या प्रकरणात, एक ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि दोन इतरांना 200 किलो ड्रग्ससह गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे, मंगळवारी एजन्सीने मुंबईच्या प्रसिद्ध मुच्छड पानवाला दुकानाच्या मालकांपैकी एक रामकुमार तिवारी याला अटक केली आहे.
नार्कोटिक्सने केली आहे कारवाई
सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून बॉलिवूडमधील ड्रग्स तस्करी प्रकरणी तपास केला जात आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी एनसीबी कडून करण सजनानी या ब्रिटिश अनिवासी भारतीयाला अमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली होती. याबरोबरच अभिनेत्री दिया मिर्झा हिची माजी मॅनेजर म्हणून काम पाहिलेल्या राहिला फर्निचरवाला हिच्यासह आणखीन एका महिलेला अटक करण्यात आली होती. यानंतर या आरोपींच्या एनसीबी कोठडीत 2 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. याबरोबरच मुंबईतला मुच्छड पानवाला या आरोपीला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.
कोण आहे मुच्छड पानवाला?
मुच्छड पानवालाचे खरे नाव रामकुमार जय शंकर तिवारी असून 1970 च्या दशकामध्ये मुंबईत आल्यानंतर त्याने त्याच्या वडिलांचा पान बनवण्याचा व्यवसाय सुरू ठेवला होता. मात्र, यामध्ये प्रगती करत त्याने बॉलिवूडमधील सेलिब्रेटी व उच्चभ्रू वस्तीतील नागरिकांच्या संपर्कात राहून स्वतःचा व्यवसाय पसरवला होता. दरम्यान, मुंबईतल्या वेगवेगळ्या परिसरातील उच्चभ्रू वस्ती व बॉलिवूडमधील कलाकारांसोबत मुच्छड पानवाला याची चांगली ओळख आहे.
काय आहे प्रकरण-
अभिनेता सुशांत सिंह प्रकरणातील अंमली पदार्थ तस्कर अनुज केशवानीला एनसीबीने अटक केली होती. अनुज केशवानी करण सजनानीकडूनच अंमली पदार्थ घेऊन तस्करी करत होता. एवढेच नाही तर, परदेशातील महागड्या अंमली पदार्थांची तस्करीही हा करण सजनानी करत होता. करण सजनानी हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून तो ब्रिटिश नागरिक आहे. एनसीबीने त्याच्याकडून ७५ किलो भारतीय गांजा, तर, १२५ किलो परदेशी अमली पदार्थ जप्त केले आहेत. करन सजनानी हा परदेशी अमली पदार्थांची भारतातील गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि मेघालय या राज्यात तस्करी करत होता.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी अपत्याची माहिती निवडणूक आयोगाला चुकीची दिली होती, असा आरोप करत भाजपने त्यांच्याही राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यात दोन मंत्र्यांच्या पदावर संक्रात ओढवल्याचे चित्र आहे.