मुंबई -एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी क्रूझवरील ड्रग्स कारवाईवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी सुरुवातीपासूनच आक्षेप घेतला आहे. आता पेहचान कौन आणि फर्जिवाडा इथूनच सुरु होतो, असे ट्वीट करत नवा ट्विस्ट निर्माण केला आहे. लवकरच या प्रकरणाचा खुलासा करणार असल्याचे ते म्हणाले आहेत. त्यामुळे वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, वानखेडे यांनी एनडीपीएस कोर्टात न्यायाधिशांना सांगितले, की मला लक्ष्य करण्यात येत आहे. मी कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहे. माझी मृत आई आणि बहिणीलाही लक्ष्य करण्यात येत आहे.
क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात सध्या बाहेर जो प्रकार सुरू आहे, त्याबाबत समीर वानखेडे ह्यांनी एनडीपीएस कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. न्यायाधीश वैभव पाटील यांच्या विशेष NDPS कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे.
यात खालिल मुद्द्यांचा समावेश आहे-
१) या गुन्ह्याबाबत समाज माध्यमांवर सतत उलटसुलट चर्चा सुरू आहे
२) अनेक पंचांची नाव उघड होत आहेत
३) एनसीबी अधिकाऱ्यांवर राजकीय नेत्यांकडनं गंभीर आरोप होत आहेत, याची कोर्टाला माहिती देण्यात आली
४) तपासावर आणि खटल्यावर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी एनसीबीचं पाऊल
५) "माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी कधीही चुकीचा वागलेलो नाही
६) माझ्यावरील सर्व आरोप निराधार असून मी कोणत्याही चौकशीला सामोरा जायला तयार आहे"
७) समीर वानखेडे स्वत: कोर्टाला काही माहिती देण्यासाठी साक्षीदाराच्या पिंज-यात उभे राहीले
८) "मला वैयक्तिकरित्या काही जणांकडनं लक्ष्य केलं जातंय. माझ्यावर, माझ्या कुटुंबियांवर सतत आरोप केले जात आहेत. आजही माझे काही खाजगी फोटो लिक करण्यात आलेत"
कार्डिलीया क्रूझवर 2 ऑक्टोबरला एनसीबीने मोठी कारवाई केली. सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह 11 जणांना ड्रग्स पार्टी प्रकरणी ताब्यात घेतले. एनसीबीने मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आतापर्यंत पेडलरसहीत वीस ते पंचवीस जणांना अटक केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीची कारवाई बनावट असल्याचा आरोप करत त्याचे व्हिडीओ - फोटो प्रसारमाध्यमांना सादर केले होते. आता एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात दोन फोटो ट्विटवर वायरल केले आहेत. पैकी एक जुना फोटो ट्विट करताना, पैचान कौन असा स्लग दिला आहे. हा फोटो वानखेडे यांच्या तरुणपणातील आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये महापालिकेचा एक कागद पोस्ट केला आहे. तो कागद नेमका कशा संबंधातील आहे, हे स्पष्टपणे दिसत नाही. मात्र, हा कागद पोस्ट करताना मलिक यांनी त्यावर समीर दाऊद वानखेडे यांच्या फर्जीवाडा इथूनच सुरू झाला असे नमूद केले आहे. मलिक यांनी पोस्ट केलेले सर्टिफिकेट विवाह नोंदणीचे सर्टिफिकेट असल्याचे बोलले जात आहे.
प्रभाकर साईलचे नेमके आरोप काय? -
आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. के.पी. गोसावी यांचे बॉडीगार्ड असलेले साईल यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचे मी फोनवरील संभाषण ऐकल होत. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असे दोघांमध्ये संभाषण झाले.
अशी झाली कारवाई -
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ही रेव्ह पार्टी सुरु होती. या क्रूझवर फॅशन शोचे आयोजन केले होते. शनिवारी निघून ही बोट सोमवारी मुंबईत परतणार होती. या क्रूझवर हायप्रोफाईल रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. हायप्रोफाईल पार्टी असल्याने एनसीबीने शेवटपर्यंत या ऑपरेशनविषयी गुप्तता बाळगली.
हेही वाचा-माझ्यावर छुप्या हेतूने कायदेशीर कारवाई होणार नाही याची खात्री करा, समीर वानखेडेंची पोलिसांना विनंती