मुंबई - महाराष्ट्रात ड्रग्सचे मोठे रॅकेट सुरू आहे. या रॅकेटमधून अनेक लोकांना फसवले जातेय. फसवणूक झालेल्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात खंडणी उकळली जातेय. चांडाळ चौकडीच्या माध्यमातून हे सर्व ट्रक रॅकेट सुरू असून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे, अधिकारी वि के सिंग, आशिष रंजन आणि समीर वानखेडे यांचा ड्रायव्हर माने हे सर्व मिळून लोकांना ड्रग्सच्या खोट्या आरोपाखाली अडकवायचे आणि त्यानंतर या चांडाळचौकडी त्यांच्याकडून पैसे उकळायचे, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
कार्डेलिया क्रूज पार्टीमध्ये अस्लम शेख यांना आमंत्रण -
ज्या कार्डेलिया क्रूज पार्टी प्रकरणांमध्ये शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. याच पार्टीमध्ये मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनाही आमंत्रित करण्यात आला असल्याचा धक्कादायक खुलासा नवाब मलिक यांनी केला. या पार्टीचा आयोजक काशिफ खान यांनी अनेक वेळा असलम शेख यांना फोन करून पार्टीमध्ये येण्याचा आग्रह धरला होता. मात्र या पार्टीला अस्लम शेख गेले नाही. जर असलम शेख चुकून या पार्टीला गेले असते तर, त्यांनाही या प्रकरणात गोवल गेलं असतं. आणि ज्याप्रमाणे पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स पसरला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही ड्रग्सचा विळखा बसला, असं दाखवण्याचा प्रयत्न केला गेला असता. ज्याप्रमाणे उडता पंजाब म्हटलं जातं. त्याचप्रमाणे उडता महाराष्ट्र करण्याचं कट-कारस्थान या पार्टीच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे त्या सर्व प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी आम्ही केली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
हॉटेल ललितमध्ये वानखडे यांच्या प्रायव्हेट आर्मीच्या बैठका -
मुंबईमध्ये असलेल्या हॉटेल ललितमध्ये अद्रक प्रकरणाबाबतच्या अनेक बैठका होत होत्या. या हॉटेलमध्ये सुनील पाटीलच्या नावाने सात महिने रूम बुक करण्यात आलेली होती. या रूममध्ये आणि हॉटेलमध्ये समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीच्या बैठका होत होत्या. तसेच या प्रायव्हेट आर्मी सोबत मुंबईचे काही पत्रकार देखील सामील असल्याचा नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. तसेच सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता नाही. याआधी सुनील पाटील बरोबर आपली कोणतीही भेट किंवा चर्चा झालेली नाही. मात्र ज्या वेळेस क्रूज प्रकरण समोर आलं, त्यानंतर सुनील पाटील यांनी फोनवर संपर्क साधून या प्रकरणांमध्ये असलेलं सत्य आपल्याला सांगणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यानंतर ही सुनील पाटील यांच्यासोबत आपली भेट झाली नसल्याचं नवाब मलिक यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून सांगितले.