मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतली. या बाबत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली सदिच्छा भेट- नवाब मलिक 'देवेंद्र फडणवीसांची ती सदिच्छा भेट' -
शरद पवारसाहेबांवर शस्त्रक्रिया झाल्यावर ते हॉस्पिटलमध्ये होते, त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी विश्रांती घेत होते. या कालावधीत अनेक लोकांनी प्रकृतीची घरी येऊन विचारपूस केली होती. त्याच अनुषंगाने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ही सदिच्छा भेट घेतली, दुसरे काही नाही असेही नवाब मलिक म्हणाले.
'मराठा समाजाने राज्यसरकारने जाहीर केलेल्या EWSमध्ये लाभ घ्यावा' -
EWSमध्ये मराठा समाजाला लाभ घेता येईल असा आदेश सरकारच्यावतीने निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली. कुठल्याही वर्गात आरक्षणाचा लाभ मिळत नाही त्या समाजाला EWSमध्ये लाभ मिळणार आहे. ज्यांचे उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी आहे त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.
'निर्णयामुळे मराठा समाजाला थोडाफार दिलासा मिळेल' -
आजच्या घडीला मराठा समाजाला जे विशेष आरक्षण देण्यात आले होते ते न्यायालयाने रद्द केले आहे. आता ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे आता जो गरीब मराठा वर्ग आहे, त्यांना राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी राज्यसरकारने हा आदेश निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाला थोडाफार दिलासा मिळेल, असेही नवाब मलिक म्हणाले.