मुंबई - राज्याची परवानगी न घेता कोरोनाचे नियम तोडून क्रुझ पार्टीवर छापा टाकण्यात आला. त्यात एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया होता. तो दाढीवाला असून तिथे नाचत होता. काही लोकांच्या म्हणण्यानुसार तो तिहार जेल आणि राजस्थानमधील जेलमध्ये होता. तो दाढीवाला माफिया कोण? दाढीवाल्याची मित्रता वानखेडेसोबत आहे का? त्याला अटक का करण्यात आली नाही, असा सवाल नवाब मलिक यांनी पत्रकारपरिषदेत केला.
दिल्लीतील पथकाने शोध घ्यावा -
कार्डिया क्रूजवर केलेली पूर्ण कारवाई ही समीर वानखेडे तसेच एनसीबीचा बनाव होता असा धक्कादायक आरोप त्यांनी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे. काही विशेष लोकांचे फोटो एनसीबी अधिकार्यांकडे होते. केवळ मोजक्या लोकांवर कारवाई करण्यासाठी या पार्टीचं आयोजन केलं होतं धक्कादायक आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. दिल्लीतील केंद्रीय पथक मुंबईत येत आहे. त्यांनी या दाढीवाल्याचा आणि त्याच्या मेहबुबाचा शोध घ्यावा. अन्यथा काही दिवसात मी सर्व पुरावे देणार असल्याचे नवाब मलिक म्हणाले. तसेच क्रुझची आणि तेथील नृत्याचे सीसीटीव्ही फुटेज मागवा. त्यात हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया सापडेल. त्यानेच ही पार्टी आयोजित केली होती, असा दावा मलिक यांनी केला.