मुंबई:मी प्रसारमाध्यमांसमोर पत्रकार परिषदेत जे काही बोललो त्यात वानखेडे किंवा समीर वानखेडे यांचा कुठेही उल्लेख केला नाही. तरीही वानखेडे यांनी माझ्याविरोधात अवमान याचिका दाखल केली. त्यासोबत कोर्टात सादर केलेल्या माझ्या विधानांच्या उताऱ्यात स्वतःहूनच शब्द घुसडले असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. मलिकांच्या प्रतिज्ञापत्रातील म्हणण्याविषयी वानखेडे यांना प्रत्युत्तरादाखल प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश देऊन न्यायमूर्ती शाहरुख काथावाला व न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने या याचिकेवर 28 फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीतील कॅबिनेट मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यातील वाद वाढतच आहे. याआधी मलीकांनी निकाल लागेपर्यंत वानखेडेंबाबत कोणतेही विधान करणार नाही, अशी हमी दिली असतानाही त्यांनी वानखेडेंबाबतचे वक्तव्य सुरूच आहेत. यामुळे त्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा करत ज्ञानदेव वानखेडे यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. 28 डिसेंबर, 2 आणि 3 जानेवारी रोजी मलिकांनी पुन्हा वानखेडेंबाबत विधाने करत बदनामी केल्याचा दावा वानखेडे यांनी याचिकेत केला आहे. त्यामुळे मलिक यांच्यावर न्यायालयाचा वारंवार अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी तसेच याचिकेच्या खर्चाची रक्कम दंड म्हणून वसूल करावा, अशी मागणी वानखेडे यांनी याचिकेतून केली आहे.