मुंबई -अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik Arrest) यांना 23 फेब्रुवारीला ईडीने अटक केली होती. त्यानंतर पीएमएलए न्यायालयाने मलिकांना 8 दिवसांची ईडी कोठडी (Nawab Malik ED Custody) सुनावली होती. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मलिकांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी कोठडी सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ईडीने मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक (Kaptan Malik Summons) यांना समन्स बजावले होते. मात्र, त्यांनी ईडीकडून वेळ मागून घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
काय आहे प्रकरण?
दाऊद इब्राहिमच्या बहिणीला कुर्ला येथे मालमत्ता बळकावण्यासाठी मदत करणे आणि नंतर ती खरेदी करणे या आरोपाखाली मलिक यांना बुधवारी ईडीकडून अटक करण्यात आली होती. यातील पैसा हवालामार्फत टेरर फंडिंगसाठी वापरण्यात आल्याचा आरोप ईडीने ठेवला आहे. मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश पीएमएलए न्यायालयाने दिले होते. शुक्रवारी मलिक यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी त्यांना जेजे रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे त्यांच्या पोटात दुखू लागल्यामुळे जेजेमध्येच ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.