कुछ ही देर की ख़ामोशी है फिर शोर आएगा… तुम्हारा तो सिर्फ वक़्त है हमारा दौर आएगा !! : ईडी कोठडी मिळाल्यानंतर नवाब मलिक यांचं ट्विट
Nawab Malik Arrested : ७ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना ईडीकडून अटक.. न्यायालयाकडून ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी.. - Nawab Malik Arrested Live
21:57 February 23
ईडी कोठडी मिळाल्यानंतर नवाब मलिक यांचं ट्विट
20:29 February 23
मंत्री नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी
मंत्री नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी.. न्यायालयाचा निकाल
राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची ३ मार्चपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी याबाबत आदेश दिला आहे.
19:53 February 23
महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ सर्व मंत्री, आमदार उद्या धरणे धरून बसणार : छगन भुजबळ
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद सुरु.
मंत्री छगन भुजबळ -
३० वर्षात कधी नवाब मलिक यांचं नाव कुणी घेतलं नाही. मलिक यांचं तोंड बंद करण्यासाठी हा सगळं प्रकार आहे. - भुजबळ
आमच्या मंत्र्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी हा प्रकार - भुजबळ
एकत्रितपणे तिन्ही पक्ष मुकाबला करणार - भुजबळ
उद्या दहा वाजता महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ सर्व मंत्री, आमदार धरणे धरून बसणार
परवापासून तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन राज्यभर मोर्चे, आंदोलन, धरणे करणार - भुजबळ
राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही.- भुजबळ
जोपर्यंत दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा घेणार नाही - भुजबळ
विरोधी पक्षाला असुरी आनंद मिळू देणार नाही - भुजबळ
19:42 February 23
निकालाची प्रतीक्षा.. नवाब मलिक यांची मुलगी, जावई यांच्यासोबत चर्चा
अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक हे आरोपीच्या पिंजऱ्यातून खाली येऊन आता कुटुंबियांसोबत बसले आहेत... निलोफर आणि सना या दोन्ही कन्या, जावई समीर खान यांच्यासोबत चर्चा करत आहेत..
19:37 February 23
कंस आणि रावण सुध्दा मारले गेले...हेच हिंदुत्व आहे.. संजय राऊत यांचे ट्विट
संजय राऊत यांचे ट्विट -
महाविकास आघाडीशी समोरा समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू आहेत..चालू द्या . एक मंत्री कपट करून आत टाकला असे आनंदाचे भरते आले असेल तर येऊद्या. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये.. लढत राहू आणि जिंकू. कंस आणि रावण सुध्दा मारले गेले...हेच हिंदुत्व आहे.. जय महाराष्ट्र!
19:34 February 23
नवाब मलिकांच्या कोठडीवर न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला
सुनावणी पूर्ण...
आदेश देऊ, असे सांगून न्यायाधीश न्यायासनावरून उठले... थोड्या विश्रांतीनंतर न्यायाधीश आदेश सुनावणार...
19:32 February 23
नवाब मलिकांच्या अटकेनंतर ममता बॅनर्जींचा शरद पवारांना फोन..
नवाब मलिकांच्या अटकेनंतर ममता बॅनर्जींचा शरद पवारांना फोन झाला आहे. यामध्ये त्यांनी प्रकरणाची माहिती घेऊन राज्य सरकारला यामध्ये काय करता येईल, याबाबत मार्गदर्शन केल्याचे समजते.
19:31 February 23
नवाब मलिक यांच्या वकिलांचा युक्तिवाद संपला.. सरकारी वकिलांचा पुन्हा युक्तिवाद सुरु
नवाब मलिक यांच्या वकिलांचा युक्तिवाद संपला.. सरकारी वकिलांचा पुन्हा युक्तिवाद सुरु
आता प्रत्यत्तरादाखल ईडीतर्फे अनिल सिंग हे कोर्टाला पीएमएलए कायद्यातील तरतूद वाचवून दाखवत नवाब मलिक हेही यात आरोपी कसे ठरतात, हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.
कायद्यातील कलम ३ लागते की नाही, हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. मलिक यांच्या ताब्यात ती मालमत्ता आहे व मालमत्ता गुन्हेगारी कृत्यांमधील पैशांतील आहे, त्यामुळे हा सुरू असलेल्या गुन्ह्यातील प्रकार ठरतो. म्हणून कलम ३ लागू होते. त्याअंतर्गत मलिक यांची कोठडीतील चौकशी आवश्यक.
त्यांनी (देसाई) युक्तिवाद केला की, ईडीने अमुक व्यक्तीला तमुक व्यक्तीला अटक केली नाही... पण त्याच्याशी आरोपीचे (मलिक) काही देणेघेणे नाही. कोणाला अटक करायची आणि कधी करायची, हा तपास संस्थेचा विशेषाधिकार, तापासाच्या अनुषंगाने ईडी त्याचा निर्णय घेईल.
19:15 February 23
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार वर्षा बंगल्यावर दाखल
19:14 February 23
मलिक मंत्री आहेत, त्यांच्याकडे कागदपत्रे मागितली असती तर दिली असती.
Adv देसाई - मलिक मंत्री आहेत, त्यांच्याकडे कागदपत्रे मागितली असती तर दिली असती.
त्याच्या अटकेने काय साध्य होणार? वास्तवाचा गुन्ह्याशी काहीही संबंध नाही.
19:10 February 23
जर आज नवाब आज तुरुंगात गेले तर अन्याय होईल
Adv देसाई - कायद्याच्या राजवटीमुळेच हा देश टिकून आहे. त्यात आपण अयशस्वी झालो तर आपल्याकडे गमावण्यासारखे काही नाही.
जर आज नवाब आज तुरुंगात गेले तर अन्याय होईल.
19:06 February 23
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट. थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी होणार बैठक.
18:56 February 23
तुम्ही पुरावे मिळवा आणि तथ्य मांडा : मलिक यांच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद
Adv देसाई - तुम्ही पुरावे मिळवा आणि तथ्य मांडा. मलिक यांना दोषी ठरवा पण फक्त हे विधान करू नका. तुम्ही सकाळी आलात त्याना अटक केली आणि आता म्हणता टेरर फंडिंग? अस कसं.
18:48 February 23
जनतेला माहित आहे की ते कोणाला मतदान करत आहेत
वकील देसाई -
उद्या सगळीकडे हेडलाइन टेरर फंडिंग अशी असेल. गेली 25 वर्षे हा माणूस लोकसेवेत आहे. मला विश्वास आहे की, जनतेला माहित आहे की ते कोणाला मतदान करत आहेत.
18:48 February 23
रिमांड रिपोर्टमधील टेरर फंडिंग या शब्दावर देसाई यांचा तीव्र आक्षेप
18:42 February 23
मलिक यांनी हसिना पारकर यांच्याकडून मालमत्ता विकत घेतल्याचे ते स्वतः सांगतात, तो एक करार..
वकील देसाई - मलिक यांनी हसिना पारकर यांच्याकडून मालमत्ता विकत घेतल्याचे ते स्वतः सांगतात. तो कराराचा भाग आहे. या प्रकरणात नेमकं काय चाललंय याचा अंदाज घेणे गरजेचं. मला माहित नाही की 2005 मध्ये कोणती मालमत्ता रु. 300 कोटी होती... मी आज एवढ्या किमतीची कल्पना करू शकतो, पण 2005 मध्ये?
18:40 February 23
इक्बाल कासकरला या प्रकरणी अटक झालेली नाही : वकील देसाई
नवाब मलिकांचे वकील देसाई यांचा युक्तिवाद -
या प्रकरणी अन्य आरोपींना अटक झाल्याचे दिसत नाही. महत्वाचे म्हणजे इक्बाल कासकरला या प्रकरणी अटक झालेली नाही
18:23 February 23
नवाब मलिकांना आरोपीच्या पिंजऱ्यातच दिली बसण्यासाठी खुर्ची
आरोपींच्या पिंजऱ्यात बराच वेळ उभं केल्यावर नवाब मलिकांना पिंज-यातच बसण्यासाठी कोर्टाकडून खुर्ची दिली गेली. नवाब मलिकांची मुलगी आणि जावई समीर खान यांच्यासह अन्य काही कुटुंबियही कोर्टात सुनावणीसाठी उपस्थित आहे.
18:17 February 23
शरद पवारांच्या बंगल्यावरील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक संपली
शरद पवारांच्या बंगल्यावरील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक संपली. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, राजेश टोपे हसन मुश्रीफ यांच्यासह महसूलमंत्री बाळासाहबे थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सुनील केदार हेही उपस्थित होते.
18:03 February 23
महाराष्ट्र राज्यात निवडून आलेला लोकप्रतिनिधी देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेला आहे, असा समज निर्माण केला जात आहे
नवाब मलिकांचे वकील देसाई यांचा युक्तिवाद -
जेव्हा तपास यंत्रणा अटक करतत. तेव्हा अधिकार जबाबदारीने वापरने अपेक्षित . कायद्याच्या चौकटीतमध्ये कारवाई केले पाहिजे.
बेकायदेशीर अटकेची किंमत न्यायालयांनी वेळ खर्ची घालून मोजली आहे.
दाऊदविरुद्धची एफआयआर कोणीही पाहिली नाही.
गेल्या 30 वर्षांपासून तो या गुन्ह्यांसाठी ओळखला जातो पण एफआयआर 3 फेब्रुवारीलाच नोंदवला जातो.
यापैकी कोणत्याही आरोपांशी श्री मलिक यांचा संबंध जोडणारे काहीही पुरावे नाही.
महाराष्ट्र राज्यात निवडून आलेला लोकप्रतिनिधी देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेला आहे, असा समज निर्माण केला जात आहे
17:59 February 23
घटना २००३ पूर्वीची मग त्याचवेळेस कारवाई का केली नाही : मलिकांच्या वकिलांचा युक्तिवाद
नवाब मलिक यांच्या वकिलांचा युक्तिवाद सुरु. वकील देसाई म्हणाले, ही घटना 2003 च पूर्वीची आहे . तेव्हा PMLA कायदा अस्तित्वात नव्हता. तेव्हा कारवाई का केली नाही. आज अचानक 20 वर्षांनी अटक करून तपास यंत्रणा 15 दिवसाची कोठडी कशी मागू शकते.
17:58 February 23
ईडीकडून मलिकांच्या १४ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी
17:47 February 23
शरद पवारांच्या बंगल्यावर राष्ट्रवादीची महत्वाची बैठक
उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, राजेश टोपे हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते, मंत्री शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत. काँग्रेसचे मंत्रीही लवकरच सिल्व्हर ओकवर पोहोचत आहेत.
17:37 February 23
न्यायालयाच्या बाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मलिकांच्या समर्थकांनी केली गर्दी
17:35 February 23
.. तीच संपत्ती नवाब मलिकांच्या कुटुंबियांची मालकी असलेल्या कंपनीच्या नियंत्रणात : सरकारी वकील
तिच संपत्ती नवाब मलिकांच्या कुटुंबियांची मालकी असलेल्या कंपनीच्या नियंत्रणात आहे. मुनिरा यांनी ईडीला सांगितले की तिला मालमत्तेचा कोणताही मोबदला मिळालेला नाही. मालमत्तेच्या वास्तविक मालकांना एक रुपयाही अदा करण्यात आला नाही. सलीम पटेल यांनी बेकायदेशीरपणे मालमत्ता विकली, असेही सरकारी वकिलांनी म्हटले आहे.
17:33 February 23
कुर्ला येथील एक विवादीत संपत्ती ही मुळातच 'डी' गँगच्या हस्तकांशी संबंधित : सरकारी वकिलांचा दावा
आणखी एक सरदार खान, 1993 च्या बॉम्बस्फोटात दोषी ठरला होता. कुर्ला येथील एक विवादीत संपत्ती ही मुळातच 'डी' गँगच्या हस्तकांशी संबंधित होती, असा दावा सरकारी वकिलांनी न्यायालयात केला आहे.
17:32 February 23
हसीना पारकर दाऊदच्या कारवायांमध्ये सहभागी : सरकारी वकील
दाऊदची बहीण हसीना पारकर यांचे निधन झाले आहे. ती इथे दाऊदच्या कारवाया मध्ये सहभागी.. तिने अनेक मालमत्ता मिळवल्या होत्या. हसीनाने कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंडमध्ये मालमत्ता घेतली. हसिना पारकरचा सहकारी सलीम पटेल यांना अतिक्रमण हटावण्यासाठी आणि जमीन विकू नये म्हणून मुखत्यारपत्र देण्यात आले. सरकारी वकिलांचा न्यायालयात युक्तिवाद
17:17 February 23
नवाब मलिकांच्या वकिलांचा युक्तिवाद सुरु
नवाब मलिकांच्या वकिलांचा युक्तिवाद सुरु
17:06 February 23
जयंत पाटील नियोजित दौरा रद्द करून मुंबईकडे रवाना
जयंत पाटील नियोजित दौरा रद्द करून मुंबईकडे रवाना.
हसन मुश्रीफ, राजेश टोपे शरद पवारांच्या बंगल्यावर हजर
17:04 February 23
हसीना पारकरच्या माध्यमातून दाऊदच्या अनेक ठिकाणी मालमत्ता : सरकारी वकिलांचा युक्तिवाद
हसीना पारकरच्या माध्यमातून दाऊदच्या अनेक ठिकाणी मालमत्ता : सरकारी वकिलांचा युक्तिवाद
17:03 February 23
शरद पवारांचा बांगला सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादीचे मंत्री दाखल होण्यास सुरुवात.. थोड्याच वेळात बैठक
शरद पवारांचा बांगला सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादीचे मंत्री दाखल होण्यास सुरुवात.. थोड्याच वेळात बैठक
17:03 February 23
हसीना पारकरने मालमत्ता मरियमकडून घेतली होती : सरकारी वकील
हसीना पारकरने मालमत्ता मरियमकडून घेतली होती : सरकारी वकील
17:02 February 23
गोवावाला कम्पाउंडची मालमत्ता पारकरच्या ताब्यात होती : सरकारी वकील
गोवावाला कम्पाउंडची मालमत्ता पारकरच्या ताब्यात होती : सरकारी वकील
17:01 February 23
दाऊद इब्राहिमचा मालमत्तेचा व्यवसाय : सरकारी वकील अनिल सिंग
दाऊद इब्राहिमचा मालमत्तेचा व्यवसाय : सरकारी वकील अनिल सिंग
17:00 February 23
दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर मुंबईतील कामं पाहायची : सरकारी वकिलांचा युक्तिवाद सुरु
दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर मुंबईतील कामं पाहायची : सरकारी वकिलांचा युक्तिवाद सुरु
16:59 February 23
नवाब मलिक यांची बहीण आणि मुलगी न्यायालयात दाखल
नवाब मलिक यांची बहीण आणि मुलगी सना खान न्यायालयात दाखल
16:56 February 23
नवाब मलिक यांच्या अटकेनंतर बोरिवलीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर बोरिवलीत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.
16:53 February 23
मला जबरदस्तीने चौकशीला आणलं : नवाब मलिक
नवाब मलिक :
मला जबरदस्तीने चौकशीला आणलं.
समन्स न देता चौकशीला ईडी कार्यालयात आणले गेले.
16:49 February 23
नवाब मलिक न्यायालयात हजर
नवाब मलिक न्यायालयात हजर
16:42 February 23
नवाब मलिकांवरील प्रकरणावर न्यायालयात सुरु होणार युक्तिवाद
अटक केल्यानंतर नवाब मलिक यांना न्यायालयात आणण्यात आले असून, नवाब मलिक यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई युक्तिवाद करणार आहेत. थोड्याच वेळात मलिक यांना न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर हजर केले जाणार आहे.
16:38 February 23
अनिल देशमुखनंतर नवाब मलिक जेलमध्ये.. अनिल परबनी आत्ता हिशोब द्यावा लागणार : किरीट सोमय्यांचं ट्विट
अनिल देशमुखनंतर नवाब मलिक जेलमध्ये.. अनिल परबनी आत्ता हिशोब द्यावा लागणार : किरीट सोमय्यांचं ट्विट
16:29 February 23
लक्षात ठेवा.. पुरून उरेल सर्वांना, रांगडा राष्ट्रवादी गडी : कवितेद्वारे अमोल कोल्हेचा इशारा
सत्तेच्या माडीसाठी
ईडीची शिडी
विनाकारण मारी
धाडीवर धाडी
सलते सत्तेवरील महा-आघाडी
म्हणून कमळाबाई ती लाविते काडी
तपासयंत्रणा झाल्या कमळीच्या सालगडी
पाकळ्यांमध्ये नाहीत का काहीच भानगडी?
पण लक्षात ठेवा...
पुरून उरेल सर्वांना रांगडा राष्ट्रवादी गडी
16:23 February 23
ईडी, आयटी, एनसीबी, सीबीआय, पाकिस्तान, दाऊद हे भाजपच्या प्रचाराचे साधन, मदतीसाठी तैनात : खासदार प्रियांका चतुर्वेदी
नवाब मलिक यांच्या अटकेवरून शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ईडी, आयटी, एनसीबी, सीबीआय, पाकिस्तान, दाऊद हे भाजपच्या प्रचाराचे साधन आहेत, ते त्यांच्या मदतीसाठी पुढे येतात, असे त्या म्हणाल्या.
16:14 February 23
नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील
नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मलिक यांनी राजीनामा द्यावा असे ते म्हणाले.
16:02 February 23
ईडीचे पथक नवाब मालिकांना घेऊन न्यायालयात हजर.. सुनावणी होणार
अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांना घेऊन ईडीचे पथक न्यायालयात हजर झाले आहे. याप्रकरणी आता न्यायालयात सुनावणी होणार असून, न्यायालय काय निर्णय सुनावते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
15:56 February 23
नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राजकीय घडामोडी वाढल्या.. सायंकाळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूलमंत्र्यांची बैठक
मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. आज सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची संयुक्त बैठक होणार असल्याचे समजते. मलिक यांना झालेली अटक आणि त्यावर राज्य सरकारची भूमिका ठरविण्यासाठी ही बैठक होणार असल्याचे समजते.
15:52 February 23
नवाब मलिक यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण.. न्यायालयात हजर करणार
मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर ईडीचे अधिकारी त्यांना रुग्णालयात घेऊन गेले होते. तेथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर मलिक यांना आता न्यायालयात घेऊन जाण्यात येत आहे.
15:36 February 23
लढेंगे जितेंगे ईडी के आगे नही झूकेंगे
मुंबई :राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. 'लढेंगे जितेंगे, ईडी के आगे नही झूकेंगे, एक्सपोज करेंगे' अशी प्रतिक्रिया मलिक यांनी दिली आहे. नवाब मलिक यांची ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर ही पहिली प्रतिक्रिया आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) यांची आज ( बुधवारी ) सकाळपासूनच ईडी कार्यालयात चौकशी सुरू होती. अखेर त्यांना आता ईडीने अटक केली (Naeab Malik arrested by ED) आहे. आज पहाटे पाच वाजताच्या दरम्यान ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या कुर्ल्यातील राहत्या घरी पोहोचले. तिथे काही वेळ नवाब मलिक यांनी अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर त्यांना 7.45 दरम्यान ईडी अधिकारी आपल्या कार्यालयात घेऊन आले. अखेर चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
अटकेनंतर ईडी कार्यालयाबाहेर येताना नवाब मलिक
गेल्या आठवड्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी गँगस्टर दाऊद इब्राहिम कासकर याचा भाऊ इकबाल कासकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. इकबाल कासकर सह इकबाल मिरची आणि अस्लम फ्रुट यांनाही ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून केलेल्या चौकशीत कुर्ला परिसरातील एका जमीन खरेदीच्या व्यवहारात नवाब मलिक यांचं नाव समोर येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. इकबाल कासकर त्याच्याकडून केलेल्या चौकशीच्या आधारावर नवाब मलिक यांना ईडी च्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी कार्यालयात नेले असल्याची माहिती मिळत आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आले होते आरोप-
1993 च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात गुन्हेगार असणारे सरदार शहावली खान आणि सलीम पटेल या दोघांकडून नवाब मलिक यांनी कुर्ल्यातील जमीन खरेदी केली होती. कुर्ल्यात मोक्याच्या परिसरामध्ये ही तीन एकर जागा असल्याचे फडणीसांनी सांगितले होते. 2005 मध्ये या ठिकाणी दोन हजार रुपये स्क्वेअर फुटच्यावर भाव असताना केवळ पंचवीस रुपये स्केअर फुट किमतीवर ही जमीन खरेदी कशी केली ? असा प्रश्न पत्रकार परिषदेतून देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. मात्र या जमीन खरेदीत कोणताही गैरव्यवहार झाला नसून देवेंद्र फडणवीस सांगत असलेल्या तीन एकर जागा आपण खरेदी केली नाही. त्या जागेवरील काही भाग कायदेशीर रित्या खरेदी केला असल्याचे स्पष्टीकरण नवाब मलिक यांच्याकडून पत्रकार परिषदेत देण्यात आला होता.
'मुस्लिम नेते असल्यामुळे दाऊदशी संबंध जोडण्याचा प्रयत्न'-
नवाब मलिक हे सातत्याने भारतीय जनता पक्षाचे पितळ उघडे पडत आहेत. सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सत्य बोलत असल्यामुळेच नवाब मलिक त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. नवाब मलिक हे मुस्लिम असल्यामुळे त्यांचे थेट नाव दाऊदशी जोडण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातोय. आपण मुख्यमंत्री असताना देखील अशाच प्रकारे विरोधकांकडून प्रयत्न केला गेला होता. त्याचप्रमाणे नवाब मलिक यांचे नाव देतील सोडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. आम्हाला खात्री होती, ते जाहीरपणे बोलतात. त्यामुळे त्यांना अशा प्रकारे त्रास दिला जाईल, याच कल्पना होती. कशाची केस काढली त्यांनी माहीत नाही. काही झाले तरी दाऊदचे नाव घ्यायच, नोटीस पाठवायची. लोकांना बदनाम करणे, त्रास देणे आणि सत्तेचा गैरवापर करण्याचे काम सुरू आहे. केंद्र सरकारच्या विरोधात उघडपणे भूमिका मांडतात त्यांच्यावर कारवाई होत आहे.
'आकसातून कारवाई'-
कोणतीही नोटीस न देता ही आकसातून कारवाई केली जात असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. नवाब मलिक यांनी काही प्रकरणे बाहेर काढली होती. त्यामुळेच जाणीवपूर्वक ही कारवाई केली जात असल्याची टीका पाटील यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर अनेक नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर -
2019 मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेत, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची मोट बांधून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणले. शरद पवार यांच्या पुढाकारामुळे हा चमत्कार महाराष्ट्रात घडला खरा, मात्र आघाडीतील नेत्यांना नेहमीच केंद्रीय तपास यंत्रणांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या नवाब मलिक ईडीच्या रडारवर आले आहेत.
आर्यन खान प्रकरणी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप -
एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानच्या मुलाला ड्रग्स पार्टीत अटक केली. या प्रकरणात नवाब मलिक यांनी मोठ्या प्रमाणावर संशोधन करून माहिती गोळा केली. या प्रकरणांमधील तसेच पडद्यामागील सत्य सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचा पहिला धाडसी प्रयोग नवाब मलिक यांनी केला. मलिक यांनी रोज पत्रकार परिषदा घेऊन भाजप आणि नार्कोटिक्स विभाग तसेच समीर वानखेडे यांचे खरे चेहरे लोकांसमोर उघडे पाडले. समीर वानखेडे तर अडचणीत आलेच मात्र त्याचबरोबर भाजपच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.
देवेंद्र फडणवीस ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टरमाईड -
देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टरमाईड आहेत, असा धक्कादायक आरोप नवाब मलिक यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रग्ज प्रकरणातील सहभागाचा सीबीआय आणि इतर केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून तपास केला जावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली होती. तसेच फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंची बदली केल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. देशात हिटलरसारखी परिस्थिती निर्माण करुन सगळे नियम, घटना बदलून स्वतःकडे सर्व अधिकार घ्यायचे आहेत का, अशी शंका निर्माण होऊ लागली, असे नवाब मलिक म्हणाले होते. भाजपला लोकशाही संपवायची आहे. परंतु जनता त्यांना लोकशाही संपवू देणार नाही, असा इशारा मलिक यांनी दिला होता.
कुख्यात गुंडांना देवेंद्र फडणवीस यांचे आश्रय -
नागपूरचा कुख्यात गुन्हेगार मुन्ना यादव याची देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारच्या काळात बांधकाम कामगार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. बांगलादेशींच्या अवैध स्थलांतरात सहभागी असलेल्या हैदर आझमची फडणवीस यांनी मौलाना आझाद वित्त महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती, असेही त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांच्या आश्रयाने महाराष्ट्रात बनावट नोटांचे रॅकेट -
देवेंद्र फडणवीस यांच्या आश्रयाने महाराष्ट्रात बनावट नोटांचे रॅकेट सुरू असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. 'पाच वर्षांपूर्वी 8 नोव्हेंबरला देशात नोटाबंदी झाली, देशात 2000 आणि 500 च्या बनावट नोटा पकडल्या गेल्या, मात्र महाराष्ट्रात वर्षभरात बनावट नोटांची एकही घटना घडली नाही. देवेंद्र यांच्यामुळेच बनावट नोटांचे काम सुरू होते. तसेच 8 ऑक्टोबर 2017 रोजी मुंबईतील बीकेसीत एक छापेमारी झाली. यावेळी 14 कोटी 56 लाख पकडले गेले. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी मदत केल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.