महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आम्हालाही मतदानाचा अधिकार; देशमुख, मलिक यांचा न्यायालयात दावा; उद्या येणार निर्णय - अनिल देशमुख नवाब मलिक याचिका

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आम्हालाही मतदान करण्याचा अधिकार असल्याचा दावा बुधवारी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावतीने सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात करण्यात आला. याप्रकरणी आता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने आपला निकाल गुरुवारपर्यंत राखून ठेवला आहे.

Anil Deshmukh Nawab Malik
अनिल देशमुख नवाब मलिक

By

Published : Jun 8, 2022, 10:22 PM IST

मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आम्हालाही मतदान करण्याचा अधिकार असल्याचा दावा बुधवारी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावतीने सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात करण्यात आला. याप्रकरणी आता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने आपला निकाल गुरुवारपर्यंत राखून ठेवला आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर आता देशमुख आणि मलिक यांच्या मतदानाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

10 जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणूकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना म्हणजेच मविआ आणि भाजपामध्ये चांगलेच युद्ध पहायला मिळत आहे. त्यातच मविआचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आर्थिक गैरव्यवहार प्रकऱणी आणि नवाब मलिक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा समावेश असलेल्या मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी कारागृहात आहेत. या अटीतटीच्या निवडणुकीत त्यांचाही मतांचा लाभ घेण्याचा मविआचा मानस आहे. त्यासाठीच आता अनिल देशमुखांसह नवाब मलिक यांनीही मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात मतदान बजावण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज दाखल केला आहे. तर देशमुख आणि मलिक यांना मतदानाचा अधिकार नसल्याचा दावा ईडीच्यावतीने कऱण्यात आला आहे.

मलिकांना हक्कापासून वंचित ठेऊ नये - त्या अर्जावर विशेष न्यायालयात न्या. राहुल रोकडे यांच्यासमोर बुधवारी सुनावणी पार पडली. तेव्हा, मलिक यांना त्यांचे कर्तव्य बजावण्याची परवानगी देण्यात यावी, असा दावा ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी न्यायालयात केला. मलिक दोषी आढळल्यामुळे न्यायालयाने जामीन नाकारला असता तर त्यास सहमत होतो परंतु, मलिक यांना याप्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले नाही. मलिक हे विद्यमान आमदार असून अजूनही कॅबिनेट मंत्री आहेत. मतदानाच्या हक्कापासून त्यांना वंचित ठेवता येणार नाही असा दावाही यावेळी देसाई यांनी केला. सदर याचिका ही 10 जूनला होणाऱ्या मतदानासाठी काही तासांच्या जामीनासाठी आहे. तांत्रिकदृष्ट्या पाहिले तर मलिक हे सध्या कारागृहात नसून रुग्णालयात आहेत. ईडीनुसार कैदींना मतदानाचा अधिकार नाही परंतु मलिक हे रुग्णालयात असल्यामुळे त्यांना एस्कॉर्ट द्यावा आणि मतदान करण्याची मुभाही द्यावी असा युक्तिवाद देसाई यांनी केला.

विशिष्ट प्रकरणात ईडीचा युक्तिवाद लागू - ईडीच्या म्हणण्यानुसार एखादी व्यक्ती कोठडीत असल्यास त्याला मतदानाला अधिकार नाही. परंतु, हे सर्व प्रकरणांना लागू होत नाही. काही विशिष्ट प्रकरणात लागू होते. अशा प्रकरणात काही अटी लादल्या जाऊ शकतात आणि पीएमएलए कलम 45 अन्वये देशमुख यांना जामीन देऊन एस्कॉर्टसह एका दिवसासाठी विधान भवनात जाण्यास मूभा देण्यात यावी, असा दावा अनिल देशमुख यांच्यावतीने अँड. आबाद पोंडा यांनी आपला युक्तिवाद संपवला. त्याची दखल घेत न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला असून न्यायालय काय निर्णय देणार यावर देशमुख आणि मलिक यांच्या मतदानाचे भवितव्य अलवलंबून असणार आहे. त्यामुळे साऱ्यांच्या नजरा न्यायालयाच्या निकालाकडे लागून राहिल्या आहेत.

दरम्यान महाराष्ट्राच्या राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांच्या अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने अर्जाला विरोध केला असून या प्रकरणात अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग म्हणाले की या दोन वेगवेगळ्या परिस्थिती आहेत एक प्रतिबंधात्मक आणि दुसरे न्यायालयीन आदेशामुळे तुरुंगात आहेत. प्रतिबंधांत्मक प्रकारात तुमच्याजवळ वेगवेगळे वैधानिक अधिकार आहेत आणि तुरुंगात तुम्हाला मर्यादांसह वेगवेगळे अधिकार मिळतात. तसेच तुरूंगात तुमचे काही अधिकार नाकारले जातात.

यावेळी एएसजी यांनी सुप्रिम कोर्टाच्या काही आदेशांचा हवाला दिला ज्यात असे म्हटले आहे की राज्यसभा निवडणुकीत मतदान करणे हा मूलभूत अधिकार नाही. पुढे ASG अनिल सिंग यांनी असा युक्तिवाद केला की हे प्रकरण लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 62(5) अंतर्गत येते. जर तुरुंगात असलेल्या व्यक्तीला राष्ट्रपती-उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी किंवा विधानसभा आणि लोकसभेच्या कामकाजात उपस्थित राहण्याची परवानगी असेल तर त्याला या प्रकरणात पाहीले जाऊ शकत नाही कारण राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची निवड वेगळ्या कायद्याच्या आधारे केली जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details