मुंबई – राज्यात ड्रग्ज प्रकरणावरून राज्यात गेल्या काही दिवसांपासून NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिकांनी आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करत नोकरी बळकावल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. त्याचबरोबर आर्यन खानचे अपहरण करून खंडणी मागितल्याच्या आरोपांनी खळबळ माजवली. समीर वानखेडे (Sameer Wankhede) कुटुंब मुस्लीम असून स्वत:ला हिंदू असल्याचे दाखवत असल्याचा आरोप मलिकांनी केला. मलिकांच्या या आरोपावर वानखेडे कुटुंबीयांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.
मुंबई ड्रग्स आणि आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणापासून नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि भाजपवर जोरदार टीका आणि आरोपांची मालिका सुरु ठेवलीय.
आज मात्र, मलिक यांनी एक ट्विट करुन खळबळजनक आरोप केलाय. गेल्या काही दिवसांपासून काही लोक माझ्या घराची आणि शाळेची रेकी करत असल्याचा आरोप मलिकांनी केलाय. इतकंच नाही तर दोन व्यक्तींचे फोटोही मलिक यांनी ट्विट केले आहेत.जर कुणी यांना ओळखत असेल तर मला माहिती द्यावी. जे लोक या फोटोत आहेत त्यांना माझं म्हणणं आहे. जर माझ्याविषयी माहिती हवी तर मला येऊन भेटावं. मी सगळी माहिती देईन असं त्यांनी सांगितले आहे.
नवाब मलिकांची न्यायालयाला हमी -
मुंबई उच्च न्यायालयाच्या एकल न्यायमूर्ती पीठाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मनाई आदेश न काढल्याने ज्ञानदेव वानखेडे यांनी खंडपीठासमोर अपील याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी पार पडली. त्यावेळी ९ डिसेंबरच्या पुढील सुनावणीपर्यंत वानखेडे कुटुंबाविरोधात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणतेही सार्वजनिक विधान करणार नसल्याची हमी नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाला द्यावी लागली आहे.