मुंबई- कोरोनाच्या संकटाने देशात थैमान घातलेले आहे. लॉकडाऊन आणि कोरोनाचे संकट यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी लढण्यासाठी सरकारकडून मदतीचे आवाहन करण्यात आले. सरकारच्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून चिपळूण तालुक्यातील वारेली गावातील मुंबईस्थित नवतरुण उत्कर्ष मंडळ या सामाजिक संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 हजाराची मदत देण्यात आली आहे.
शिवजयंती उत्सव केला रद्द.. वारेलीच्या मुंबईस्थित नवतरुण उत्कर्ष मंडळाची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत - नवतरुण उत्कर्ष मंडळाची मदत
कोरोनाच्या संकटामुळे शिवजयंती उत्सव सोहळा रद्द करून त्यासाठी खर्च होणारी रक्कम सहाय्यता निधीत जमा केली असल्याचे चिपळूण तालुक्यातील वारेली ग्रामस्थांच्या मुबईस्थित मंडळाने सांगितले. सर्व मंडळांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोरोनासारख्या महाभयंकर रोगाविरोधात डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस आणि पालिका कर्मचारी लढत आहेत. त्यांच्या या लढ्यात आपला देखील सहभाग असावा, या उद्देशाने निधी दिल्याची भावना मंडळाच्यावतीने व्यक्त करण्यात आली. मंडळाकडून दरवर्षी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे शिवजयंती उत्सव सोहळा रद्द करून त्यासाठी खर्च होणारी रक्कम सहाय्यता निधीत जमा केली असल्याचे मुंबईतील मंडळाने सांगितले.
सन,उत्सव तर साजरे होतच राहतील मात्र आधी आपल्या देशावर जी परिस्थितीती उद्भवली आहे त्यावर मात करण्यासाठी एकीने लढण्यासाठी प्रत्येकाने सज्ज होणे अनिवार्य आहे. याच दृष्टिकोनातून वारेली गावातील मुंबईस्थित नवतरुण उत्कर्ष मंडळाच्यावतीने मदतीची भूमिका निभावली, असे मंडळाचे सदस्य सुभाष कदम यांनी सांगितले. प्रत्येक मंडाळाने जर अशी भूमिका घेतली तर ते देशासाठी नक्कीच हिताचे ठरेल, असे मत कदम यांनी व्यक्त केले.