मुंबई- महिलांनी आव्हानांना समजून ती स्वीकारावीत आणि शांततेने त्यांचा सामना करून स्वत:च्या क्षमतांचा विकास करावा. हे स्फूर्तीदायक शब्द आहेत अग्नी ५ या क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्पाच्या अध्यक्षा राहिलेल्या टेसी थॉमस यांचे. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने थॉमस यांच्या कार्याचा घेतलेला हा एक आढावा. पाहा ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट.
अग्नी ५ या मिसाईलमुळे आज पाकिस्तान आणि चीन सारख्या देशांचे धाबे दणाणले आहेत. आमच्याकडे अण्वस्त्र आहे, अशी धमकी देणारा पाकिस्तान हा अग्नी ५ मुळे वठणीवर आला असून भारताला डिवचणारा चीन देखील सावध झाला आहे. या मिसाईलमुळे भारताची शक्ती मजबूत झाली आहे. ही किमया आहे एका भारतीय स्त्रीची आणि तिचे नाव आहे टेसी थॉमस.
टेसी या अग्नी ५ मिसाईल विकास आणि संरचना विभागाच्या अध्यक्षा होत्या. केरळच्या अलापुझ्झा येथे जन्मलेल्या टेसी लहानपणापासूनच आभ्यासात हुशार होत्या. एरव्ही गणित म्हटले की विद्यार्थी घाबरतात. मात्र, टेसी यांना लहानपणापासूनच गणित आणि विज्ञान विषयाची ओढ होती. इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या बळावर टेसी यांनी १९८८ साली संरक्षण आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओमध्ये प्रवेश केला. येथे भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांची नियुक्ती अग्नी या क्षेपणास्त्र संरचना आणि विकास विभागात केली आणि येथूनच आपल्या कल्पक बुद्धीमत्तेने टेसी यांनी यशाची शिखरे गाठण्यास सुरुवात केली.