मुंबई -दादरा-नगर हवेली पोटनिवडणूक विजयामुळे शिवसेनेला नवसंजीवनी मिळाली आहे. राज्याबाहेरील हा पहिलाच विजय असल्याने सेनेचे मनोबलही वाढले आहे. अन्य राज्यात शिवसेना निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागली आहे. राष्ट्रीय स्तरावर शिवसेनेला निवडणूक लढवायची झाल्यास संघटन बांधणीचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल, असे भाकीत राजकीय विश्लेषक वर्तवतात.
पक्षवाढी पेक्षा अन्यायाविरुद्ध लढा-
दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी शिवसेना उमेदवार कलाबेन डेलकर यांनी भाजपाच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला. डेलकर यांना एकूण १ लाख १२ हजार ७४१ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार महेश गावीत यांना ६३ हजार ३८२ मते मिळाली. सुमारे ४७ हजार ४४७ मतांनी शिवसेनेने राज्याबाहेर प्रथमच विजय मिळवला आहे. या विजयामुळे शिवसेनेला उभारी मिळण्याची चिन्हे आहेत, असे बोलले जाते. राज्याचे पर्यटन मंत्री तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही दादरा नगर-हवेलीतील विजय हा शिवसेनेचा मोठा आहे, असे सांगत इतर राज्यातही सेना निवडणूक लढणार असून आम्हाला विजयाची अपेक्षा आहे, असा आशावाद व्यक्त केला आहे. तसेच पक्षसंघटना वाढीपेक्षा अन्याया विरोधात आम्ही लढा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इतर राज्यात फायदा होईल
दादरा नगर हवेलीमध्ये शिवसेनेचा पहिला उमेदवार निवडून आला आहे. महाराष्ट्राच्या बाहेर राजकारणात पाय रोवण्याची शिवसेनाला संधी आहे. सध्या केंद्र शासनाविरोधात शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पॉप्युलर चेहरा म्हणून ओळखले जातात. कोविड परिस्थितीनंतर देशभरात मुख्यमंत्री ठाकरे हे लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. इतर राज्यात त्याचा फायदा नक्की होईल, असे मत शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी व्यक्त केला.
संघटन बांधणीसाठी यंत्रणा उभारावी लागेल
दादरा नगर हवेली शिवसेनेच्या विजयाचे श्रेय खासदार संजय राऊत यांना जाते. राऊत यांची यामध्ये मोठी मेहनत आहे. दादरा नगर हवेलीनंतर राष्ट्रीय राजकारणात शिवसेना मुसंडी मारेल, असे काही सध्या तरी चित्र दिसत नाही. शिवसेनेला त्यासाठी स्थानिक स्तरावर आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल. मतदारांमध्ये ती पटवून द्यावी लागेल. वेगवेगळ्या राज्यांमध्ये सेनेला यासाठी संघटन बांधणी करावी लागेल. सध्या शिवसेनेचा भाजपाला वेगवेगळ्या राज्यांमध्ये अपयशी कसे ठरवता येईल, त्यांच्या मार्गात अडथळे कसे आणता येतील, अशा यावर भर आहे. गोव्यातदेखील शिवसेना आपली ताकद अजमावण्याची चिन्हे आहेत. मात्र, राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेला पुढे जायचे असेल तर भविष्यातील सेनेची भूमिका काय आहे, हे पटवून द्यावे लागेल. यापूर्वी काही राज्यांमध्ये शिवसेनेने संघटना स्थापन केल्या. मात्र, तेथील स्थानिक नेत्यांनी मातोश्रीचे कोणतेही आदेश न विचारात घेता, शिवसेनेच्या भूमिका विरोधात काम केले. राष्ट्रीय पातळीवर सेनेला संघटन बांधणी करायची असेल तर मोठी यंत्रणा उभारावी लागेल आणि हेच शिवसेना पुढील मोठ आव्हान असेल, असे मत राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी 'ईटीव्ही भारत' सोबत बोलताना व्यक्त केली.
हेही वाचा -एनसीबीची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावर चार कोटींचे हेरॉईन जप्त