मुंबई- सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिचे काही अमलीपदार्थ तस्करांसोबत संबंध असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. त्यानंतर या संदर्भात रिया चक्रवर्तीच्या वकिलांकडून या गोष्टीचे खंडण करण्यात आलेले आहे. मात्र, असे जरी असले तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत रिया चक्रवर्ती आणि अमली पदार्थ तस्करांच्या संबंधाचा तपास करण्यात येणार आहे.
यासाठी रिया चक्रवर्तीच्या संदर्भातील माहिती मिळवण्यासाठी सुशांतसिंगच्या जवळच्या मित्रांची चौकशी केली जाणार आहे. याबरोबरच रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक चक्रवती यांच्यासह सुशांतच्या मोबाईल सीडीआरचा तपास करण्यात येणार आहे.
सुशांतने ज्यावेळेस आत्महत्या केली होती, त्यानंतर सुशांतचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला होता. ज्या ठिकाणी रिया चक्रवर्ती ती स्वतः शवगृहात गेली असल्याचे समोर आले आहे. सुशांत मृतदेह पाहण्यासाठी रिया चक्रवर्ती कूपर रुग्णालयातील शवगृहात गेल्यानंतर त्या ठिकाणी तब्बल 45 मिनिटे थांबलेली होती. या संदर्भात त्या ठिकाणी एवढा वेळ रिया चक्रवर्ती कुठल्या कारणासाठी थांबली होती, याचा शोध घेण्यासाठी सीबीआयकडून या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.