मुंबई -नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या दक्षता पथकाने मंगळवारी प्रभाकर साईल 11 तासांहून अधिक वेळ चौकशी केली. प्रभाकर साईल हा मुंबईतील ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार केपी गोसावी याचा बॉडीगार्ड असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला लाच मागितल्याप्रकरणी प्रभाकरची चौकशी करण्यात आली आहे.
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकर साईल आणि त्यांचे वकील तुषाल खांद्रे सकाळी 11.55 वाजता सीआरपीएफ कॅम्पमध्ये दक्षता पथकात पोहोचले होते. रात्री उशिरा 11.25 वाजेपर्यंत प्रभाकर साईलची चौकशी सुरू होती. सोमवारी प्रभाकरची 10 तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली. मंगळवारीही दक्षता पथकाने प्रभाकरवर प्रश्नांचा भडिमार केला. प्रभाकर साईलची 11 नोव्हेंबरला पुन्हा चौकशी होणार असल्याची माहिती साईलचे वकील हेमंत इंगळे यांनी दिली आहे.
हेही वाचा-'उनकी नींद खो गई है, अब चैन खोने का वक्त आ गया है'; नवाब मलिक यांचे सूचक ट्विट
प्रभाकर साईलचा हा आहे आरोप-
तपास यंत्रणेने गुरुवारी प्रभाकर साईलला चौकशीसाठी बोलावले आहे. दक्षता पथकाचे नेतृत्व एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह करत आहेत. क्रूझ ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या आर्यन खानच्या सुटकेच्या बदल्यात 25 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे प्रभाकर साईल यांनी प्रतिज्ञापत्रात सांगितले होते. या डीलमधून मिळालेले आठ कोटी रुपये एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना देण्यात येतील, असे गोसावी यांनी सांगितल्याचा दावा साईलने केला होता. प्रभाकर साईलच्या या आरोपांनंतर एनसीबीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. मात्र, समीर वानखेडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.