मुंबई -शिवसेना नेते संजय राऊत यांनी अंगावर आले तर शिंगावर घेवू असा इशारा भाजपाला दिला होता. त्याला भाजपा खासदार नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत काय शिंगावर घेणार? त्यांना शिंग तरी आहेत कुठे असा खोचक टोला नारायण राणे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. शिवसेना भवनासमोर भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता, त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या वेळी त्यांनी थेट संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. आताची शिवसेना ही बिन शिंगाची शिवसेना आहे. आता फटके देणारी शिवसेना राहिली नाही, ही केवळ पैसे जमवणारी शिवसेना आहे.अशी टीका नारायण राणे यांनी यावेळी केली आहे.
दरम्यान शिवसेना भवनासमोर भाजपा कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्कार केला होता. त्यावरही नारायण राणे यांनी टीका केली, मुख्यमंत्री हेच करणार त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा आहे. त्यांच्याकडे काही वैचारिकता आहे का? भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार करतात. महिलांवर हल्ला करणाऱ्यांचं कौतुक करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशा शद्बात नारायण राणे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधला.
संजय राऊत सेनेत आहेत की राष्ट्रवादीमध्ये - राणे
शिवसेना भवनासमोर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन, संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे. ज्यांनी कधी कोणाच्या कानशिलात लगावली नाही त्यांनी धमकीची भाषा करू नये. संजय राऊत नेमके शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीमध्ये असा सवालही राणे यांनी यावेळी उपस्थित केला.