महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आरोप प्रत्यारोपानंतर नारायण राणेंनी घेतले बाळसाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन, म्हणाले... - बाळसाहेब स्मृतीस्थळ

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला राणे यांनी भेट दिल्यानंतर बाळासाहेब असते तर आशीर्वादच दिले असते, अशा भावना व्यक्त केल्या. सावरकर स्मारकाला देखील भेट दिल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नारायण राणे दर्शन घेतांना
नारायण राणे दर्शन घेतांना

By

Published : Aug 19, 2021, 4:53 PM IST

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मुंबईतून आजपासून (गुरूवारी) सुरुवात झाली. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला राणे यांनी भेट दिल्यानंतर बाळासाहेब असते तर आशीर्वादच दिले असते, अशा भावना व्यक्त केल्या. सावरकर स्मारकाला देखील भेट दिल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. स्मृतीस्थळाला भेट देऊ देणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी दिला होता. मात्र आज शिवसेनेने मवाळ भूमिका घेतल्याने नारायण राणेंची यात्रा शांततापूर्ण वातावरणात पार पडली.

'अशीच प्रगती करत रहा'

छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. दादर येथील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट दिली. मी जनआशीर्वाद यात्रेनिमित्त बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या ठिकाणी नतमस्तक झालो. साहेब आज तुम्ही आशीर्वाद द्यायला हवे होता, असेही राणे यावेळी म्हणाले. जे काही घडले, तुमच्यामुळे घडलो. आज बाळासाहेब असते तर आशीर्वाद दिले असते. बाळासाहेब नसले तरीही आशीर्वाद डोक्यावर आहेत. ते म्हणाले असते की नारायण अशीच प्रगती करत रहा, अशा भावनाही नारायण राणे यांनी व्यक्त केली. कोणत्याही व्यक्तीचे स्मारक असो विरोधाची भाषा नको, त्या भावनेचा आदर करायला हवा असेही राणे म्हणाले. ज्यांना विरोधात बोलायचे आहे त्यांनी स्वतः बोलावं, उजव्या डाव्यांना बोलायला लावू नये. आम्ही त्यांनाही थेट उत्तर देऊ. कोणी आपल्यात मांजरीसारखे आडवे येऊ नये, असेही राणे म्हणाले. येत्या महापालिका निवडणुकीत पापाचा ३२ वर्षांचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही, असेही नारायण राणे यांनी सांगितले.

'मुंबई महापालिका जिंकणारच'

मुंबई महापालिका जिंकणे हीच जबाबदारी पक्षाने माझ्याकडे दिली आहे. काहीही झाले तरीही महापालिका जिंकणारच, असेही ते म्हणाले. मुंबई महापालिकेसाठी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर साऱ्यांकडेच जबाबदारी दिली आहे. आता कोरोनाचे नियम सांगून उगाच उपदेशाची भाषा करू नये. फारच थोडे दिवस राहिले असल्याचे राणे म्हणाले.

'शिवसेनेचे काम पैसे खाण्याचे'

मुंबईतील जनआशीर्वाद यात्रेतून राणे यांनी शिवसेनेवर जोरदार प्रहार केला. आजपर्यंत शिवसेनेने काहीही केलेले नाही. सत्तेत राहून केवळ पैसे खाण्याचे काम केल्याचा गंभीर आरोप राणे यांनी दादर नायगाव येथील रॅलीत केला. मुंबईच्या विकासा ऐवजी मातोश्रीचा विकास केला. कुठेही चांगले रस्ते नाहीत, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसनेने आजपर्यंत काय केले? असा सवालही राणे यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र आतापर्यंत बाहेर पडलेले नाहीत, असे सांगत शिवसेनेला डीचवण्याचा प्रयत्न राणेंनी केला आहे. शिवसेना याला कशाप्रकारे प्रतिउत्तर देणार ते येत्या काळात कळेल.


दादर भगवामय

राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मुंबईत आज रस्त्यांवर पक्षाचे झेंडे लावण्यात आले होते. शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले होते. भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही मोठी गर्दी केली होती. दुचाकी - चारचाकी वाहनावरून कार्यकर्त्यांनी रॅली काढली. भाजपाचा जयघोष करण्यात येत होता. मात्र दादर परिसरात शिवसैनिकांनी इशारा दिल्यानंतर पोलिसांनी कडेकोट सुरक्षा ठेवली होती. स्मृतीस्थळावरून ये-जा करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करण्यात येत होती. शिवसैनिकांनीही मवाळ भूमिका घेतल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

हेही वाचा -शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाबाहेर मोठा बंदोबस्त, नारायण राणे घेणार का दर्शन?

ABOUT THE AUTHOR

...view details