मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेवर सडकून टीका करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत व शिवसेनेवर टीका केली आहे. आयएनएस विक्रांत प्रकरणी भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी ५८ कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या वक्तव्याचा नारायण राणे यांनी भरपूर समाचार घेतला. यांनी कुठे, किती पैसे कमावले, याची माहिती मला आहे, ईडीलासुद्धा नाही, असा त्यांनी दावा केला. घरच्या टेरेसवरील केलेले भाजीपाल्याचे गार्डन हे अनधिकृत असल्याचेही त्यांनी यावेळी कबूल केले.
संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकार यांनी मुंबईमध्ये परिषद केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.
वर्गणी घेतली म्हणून केसेस तर शिवसेनेवर किती केसेस हव्यात? -नारायण राणे म्हणाले की, किरीट सोमैय्या यांनी ५८ कोटी रुपये जमा केले असे संजय राऊत म्हणतात. संजय राऊत यांना हा आकडा कोणी दिला? असा प्रश्नही नारायण राणे यांनी या प्रसंगी उपस्थित केला. किरीट सोमैय्या यांनी जर वर्गणी काढून घोटाळा केला असेल तर मी शिवसेनेच्या स्थापनेपासून सेनेसाठी काम केले आहे. शिवसेनेने प्रत्येक सण, उत्सवाला लोकांकडून वर्गणी जमा केली आहे. गणपती असो, दहीहंडी उत्सव असो, नवरात्र असो प्रत्येक सणाला त्यांनी वर्गणी काढली आहे. जर वर्गणी काढल्याबद्दल केसेस नोंदवल्या जात असतील तर शिवसेनेवर आत्तापर्यंत किती केसेस नोंदवायला हव्यात? असा आरोपही नारायण राणे यांनी केला आहे. यांनी कुठे आणि किती पैसे कमावले त्याची माहिती कदाचित ईडीला नसेल. पण मला आहे, असेही नारायण राणे यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादीचे मस्त चाललंय! -सध्या राज्यात राष्ट्रवादीचे मस्त चालू आहे. संजय राऊत यांना पवारांनी सांगितले आहे की तुम्ही शिवसेनेची वाट लावा, नंतर माझ्याकडे या. म्हणून संजय राऊत यांना उद्धव ठाकरेपेक्षा शरद पवार हे बॉस वाटतात, असा टोमणाही नारायण राणे यांनी लगावला आहे. सध्या महाराष्ट्रात जे काही चालू आहे ते त्यांचे पाप लपविण्यासाठी करत आहेत असेही नारायण राणे म्हणाले. यासाठी कोणी तरी पुढाकार घ्यायला हवा असेही राणे म्हणाले.
स्वागत कशासाठी? -पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नारायण राणे ( Union Minister Narayan Rane press ) म्हणाले, की महाराजांचे नाव घेऊन यांनी कमाई करायची. आडमार्गाने पैसे भेटावे म्हणून सरकारमधील काही लोक प्रयत्न करत आहेत. हे सर्व असताना संजय राऊत ( MP Sanjay Raut language ) हेसुद्धा पत्रकार परिषदेमध्ये काही भाषा वापरतात. त्यावरून ते कुठल्या स्तरावर आहेत, हे जनतेला समजून येते.
संजय राऊत शिवसेना संपवण्यासाठी!- पुढे नारायण राणे म्हणाले, की संजय राऊत यांनी गैरमार्गाने पैसा कमाविला असेल तर त्यांच्यावर कारवाई नक्की होईल. एक पगारी नेता म्हणून संजय राऊत काम करत आहेत. भाजप तुम्हाला घाबरते हे कोणी सांगितले? असा प्रश्नही नारायण राणे यांनी उपस्थित केला. तोल गेल्यावर लोक अशी भाषा बोलतात असेही ते म्हणाले. त्यांचे वृत्तपत्र फक्त शिव्या छापण्यासाठी आहे. विक्रांतबद्दल ५८ कोटी रुपयांचा आकडा कुठून आला यावर शिवसेना बोलत नाही. प्रत्येक उत्सवाला शिवसेनेने वर्गणी काढली आहे. जर त्याची चौकशी करायला गेले तर त्यांना सर्व हिशोब द्यावा लागेल. अशा परिस्थितीत यांच्यावर किती गुन्हे दाखल होतील असा उपरोधिक टोलाही नारायण राणे यांनी लगावला आहे.