मुंबई -केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत मातोश्रीवरील चौघांना ईडीची नोटीस मिळणार असल्याची भविष्यवाणी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना मंत्री एकनाथ शिंदेंनी राणेंनी त्यांची नावे उघड करावी, असे आव्हान दिले होते. त्यावर एकनाथ शिंदे हे चतुर राजकारणी आहेत. ते बाशिंग बांधून उभे आहेत, असा टोला नारायण राणेंनी शिंदे यांना लगावला ( Narayan Rane On Eknath Shinde ) आहे.
प्रसारमाध्यमांना बोलताना नारायण राणे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे चतुर राजकारणी आहेत. ते बाशिंग बांधून उभे आहेत. आपण मातोश्री मधील चार लोकांची नावे समोर आणल्यास शिवसेना मधून त्यांना संधी मिळेल. हे त्यांना माहिती आहे. म्हणून ते नावे सांगा असे, म्हणतात, अशी मिश्किल टीका राणेंनी शिंदेवर केली आहे.
राजकारणातले प्रदूषण कमी...
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजकारणातले प्रदूषण कमी करु, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार घेत नारायण राणे यांनी म्हटलं की, राजकारणातले प्रदूषण कमी करण्यापेक्षा वातावरणातील प्रदूषण कमी करा, आदित्य अजून लहान आहेत. त्यामुळे त्यांच्यावर थेट बोलता येत नाही. मात्र, चांगले काम केलं तर नक्कीच कौतुक करेन, असेही राणे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना टोला
मी कोणाच्या आजारपणावर बोलणार नाही. मात्र, आता उभे राहायला पण दोन माणसे लागतात. मराठी माणसाला देण्यासाठी काही तरी करा. मंत्रायलात, सभागृहात मुख्यमंत्री जात नाही. गुणवत्ता आणि पात्रता नसताना सव्वादोन वर्ष काढले, अशी टीकाही नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.
हेही वाचा -Raj Thackeray : गोरेगावमध्ये राज ठाकरेंच्या कार्यक्रमातील स्टेज कोसळले