मुंबई-प्रवाशांकरिता मुंबई ते नागपूर हा 16 तासांचे अंतर केवळ 8 तासांवर आणण्यासाठी मुंबई ते नागपुर हा 701 किमीचा समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प मे 2022 मध्ये पूर्ण होणार आहे. भविष्यात याच मार्गावरून जालना ते नांदेड असा प्रवास करता येणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी एमएसआरडीए सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्यासंदर्भात 2 फेब्रुवारीला निविदा मागविली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्ग जालना ते नांदेड असा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एमएसआरडीसी कामाला लागले आहे. हा प्रकल्प तयार झाल्यास एकीकडे मुंबई ते नागपूर तर दुसरीकडे मुंबई ते नांदेड आणि जालना ते नांदेड प्रवास सुकर आणि सुपरफास्ट होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प मराठवाड्याला मोठा दिलासा देणारा प्रकल्प ठरणार आहे.
समृद्धीचा पहिला टप्पा मे 2021 मध्ये होणार पूर्ण
मुंबई ते नागपूर हा 701 किमीचा समृद्धी महामार्ग बांधण्यात येत आहे. 8 मार्गिकेच्या मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला 2018 मध्ये सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार या प्रकल्पातील नागपूर ते शिर्डी हा 520 किमीचा टप्पा मे 2021 ला पूर्ण होणार आहे. तर 623 किमीचा नागपूर ते इगतपुरी टप्पा डिसेंबर 2021 ला पूर्ण करण्यात येणार आहे. तर संपूर्ण 701 किमीचा मुंबई ते नागपूर मार्ग मे 2022 मध्ये वाहतूक सेवेत दाखल होणार आहे.
मागील महिन्यात जालना-नांदेड विस्तारिकरणाला सरकारची मंजुरी
नांदेडचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी समृद्धीचा विस्तार नांदेडपर्यंत करावा, जालन्यावरून पुढे हा महामार्ग नांदेडला जोडावा, अशी मागणी केली. यासाठी सरकारीस्तरावर पाठपुरावा केला. अखेर या पाठपुराव्याला यश आले. मागील महिन्यात राज्य सरकारच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या समितीने जालन्यावरून पुढे हा महामार्ग नांदेडला जोडण्याला हिरवा कंदील दाखवला. ही मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रकल्प मार्गी लागणार यावर शिक्कामोर्तब झाले.
हेही वाचा-शेअर बाजाराचे नवे विक्रम सुरुच; ओलांडला ५१ हजारांचा टप्पा