मुंबई- राष्ट्रीय आघाडीमधला आत्मा काँग्रेस पक्षात असेल असा साक्षात्कार खासदार संजय राऊत यांना झाला, ही चांगली गोष्ट आहे. युपीएमध्ये यायचे असेल तर शिवसेनेचे काँग्रेसकडून स्वागत आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांना राष्ट्रीय आघाडीचा आत्मा काँग्रेस पक्ष असल्याचा साक्षात्कार झालाय, ही चांगली गोष्ट आहे. असा चिमटा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काढला आहे. खासदार संजय राऊत यांनी देशात राष्ट्रीय आघाडी काढली जावी. मात्र, ही आघाडी काँग्रेस पक्षाच्या शिवाय असू शकत नाही. या आघाडीचा आत्मा काँग्रेस पक्षच असू शकेल. यासंबंधी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत चर्चा देखील केली आहे, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर संजय राऊत यांना चिमटा काढत नाना पटोले यांनी संजय राऊत यांना साक्षात्कार झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मात्र, देशांमध्ये आधीपासूनच युपीए अस्तित्वात आहे. या यूपीएचे नेतृत्व काँग्रेस पक्ष करत असून, आता देशातील जनतेला कळून चुकले की, या देशात काँग्रेस शिवाय पर्याय नाही. मात्र, तिसरी आघाडी तयार करण्यासंदर्भात कोण विचार करत असेल तर, ते देशाच्या हिताचे ठरणार नाही. कोणी तिसरी आघाडी काढायला निघाले असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला देश वाचवायचा आहे. देश वाचवायला काँग्रेस सक्षम आहे, असा इशाराही नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.