महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

काँग्रेस कार्यकर्त्यांनी गरीब कुटुंबांच्या लसीकरणाचा भार उचलावा - नाना पटोले - नाना पटोले

महाविकास आघाडी सरकार वर्षभरापासून मोठ्या धैर्याने करत आहे. मात्र, केंद्र सरकारने आपली जबाबदारी झटकली आहे. परंतु, महाराष्ट्र सरकारने जनतेला वाऱ्यावर न सोडता १८ वर्षावरील सर्वांच्या मोफत लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता मदतीचा ओघ वाढला पाहिजे. काँग्रेस आमदारांचे एक महिन्याचे वेतन व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ५ लाख रुपये अशी मदत मुख्यमंत्री सहायता निधीला केली आहे.

Nana Patolech
Nana Patolech

By

Published : May 1, 2021, 5:06 PM IST

मुंबई - राज्यासमोर आर्थिक संकट असतानाही १८ वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. “राज्य सरकारच्या या निर्णयाला हातभार लावण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या शेजारच्या गोरगरीब कुटुंबांना दत्तक घेऊन स्वतःचा व त्या कुटुंबांच्या लसीकरणाचा खर्च उचलून ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावी”, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीला हातभार लावा

कोरोना हे देशावर आणि राज्यावर आलेले अभूतपूर्व संकट आहे. दररोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या पहावत नाही. या संकटाचा सामना महाविकास आघाडी सरकार वर्षभरापासून मोठ्या धैर्याने करत आहे. मात्र, केंद्र सरकारने आपली जबाबदारी झटकली आहे. परंतु, महाराष्ट्र सरकारने जनतेला वाऱ्यावर न सोडता १८ वर्षावरील सर्वांच्या मोफत लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता मदतीचा ओघ वाढला पाहिजे. काँग्रेस आमदारांचे एक महिन्याचे वेतन व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ५ लाख रुपये अशी मदत मुख्यमंत्री सहायता निधीला केली आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात कोविड सहायता केंद्राची स्थापना करून गरजू रुग्णांना बेड्स मिळवून देणे, वैद्यकीय सहायता पुरवणे याबरोबरच रक्तदान शिबिर आयोजित करून मदतीचे कार्य सुरु ठेवले आहे. “लसीकरणाचा खर्च मोठा आहे, त्याला हातभार म्हणून काँग्रेस कार्यकर्ते आपल्या परिसरातील गरीब कुटुंबांना दत्तक घेऊन स्वतःच्या व त्या कुटुंबाच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्यावा”, असे आवाहन नाना पटोले यांनी केले. तसेच नोंदणी करून लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकांना मदत करावी, अशा सूचना केल्या.

असा बेजबाबदार पंतप्रधान जगात कुठेच नसेल

केंद्रातील मोदी सरकारने कोरोनाची परिस्थिती अत्यंत निष्काळजीपणे हाताळली, सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे देशाची झालेली स्थिती पाहून सुप्रीम कोर्टानेही, “देशाच्या जनतेला मरायला सोडलं आहे का”?, असा संतप्त सवाल केला. अनेक गावे स्मशान झाल्याचे विदारक चित्र दिसत आहे. आतापर्यंत मोठे नुकसान झाले आहे. सध्यातरी लसीकरण हाच यावरील प्रभावी उपाय ठरत आहे. पण केंद्र सरकारने आपल्या देशातील लस दुसऱ्या देशांना पाठवली. ज्या पाकिस्तानला नेहमी शिव्या देता त्यांनाही ४.५ कोटी लसी दिल्या. एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही, असा टोला पटोले पंतप्रधान मोदींना लगावला.

वेगळ्या विदर्भाची मागणी आजच्या दिवशी योग्य नाही

माजी आमदार आशिष देशमुख यांनी महाराष्ट्र दिनी वेगळ्या विदर्भाची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. याबाबत नाना पटोले यांना विचारले असता, “देशमुख हे राष्ट्रीय स्तरावरील नेते असल्याचा, उपरोधक टोला लगावत म्हणाले, त्यांच्याबद्दल बोलण योग्य नाही”, असे पटोले म्हणाले. तसेच आज संयुक्त महाराष्ट्र दिन आहे, त्यामुळे असे वक्तव्य करने, योग्य नसल्याचे पटोले यांनी सांगितले.

हे नेते होते उपस्थित

महाराष्ट्र दिनानिमित्त दादर येथील प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. सोशल डिस्टसिंगचे पालन यावेळी करण्यात आले होते. शेवटी काँग्रेसच्या शिदोरी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, यशवंत हाप्पे, राजन भोसले, डॉ. गजानन देसाई, प्रवक्ते सचिन सावंत, अतुल लोंढे, प्रदेश काँग्रेसचे सचिव राजाराम देशमुख, मेहुल वोरा, झिशान अहमद, रमेश कीर, प्रमोद मोरे, डॉ. संजय लाखे पाटील, देवानंद पवार आदी यावेळी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details