मुंबई- राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजपाचे नेते सैरभेर झालेले आहेत. केंद्राच्या मदतीने राज्यातील सरकार अस्थिर करण्याचे सगळे प्रयत्न विफल झाल्याने आता त्यांचा तोल ढासळला आहे. चंद्रकांत पाटलांना तेलकट थापा मारून केंद्राचे अपयश आणि मराठा, ओबीसी समाजाच्या फसवणूकीचे पाप झाकता येणार नाही, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटलावर केला. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला काहीही म्हटले तरी आम्ही भाजपा नेत्यांना 'चंपा' किंवा 'टरबुज्या' म्हणणार नाही. ती आमची संस्कृती नाही, असेही पटोले म्हणाले.
अपयश झाकण्याचा प्रयत्न
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून केंद्र सरकारने आणलेल्या तीन काळ्या कायद्यांविरोधात देशाच्या राजधानीच्या वेशीवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी मोदी सरकारकडे काही ठोस धोरण नाही. लसीकरण मोहिमेचा बोजवारा उडालेला आहे. गंगेच्या पात्रातून वाहणारे हजारो मृतदेह जगभरातील माध्यमांनी दाखवल्यामुळे मोदी सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. मोदी सरकारने केंद्रीय आरोग्यमंत्री आणि पेट्रोलियम मंत्री बदलून मोदींनी आपल्या अपयशाची कबुलीच दिली आहे. पण चंद्रकांत पाटलांसारखे बोलघेवडे विरोधीपक्षांच्या नेत्यांवर टीका करून मोदी सरकारचे अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप पटोले यांनी केला.