महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मोदींशी दोन हात करणारे नाना पटोले होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष; अशी आहे कारकीर्द - nana patole resign

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दोन हात करणाऱया नाना पटोलेंच्या गळ्यात लवकरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडणार आहे. नाना पटोले यांनी आज(4 फेब्रुवारी) विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

nana patole
नाना पटोले

By

Published : Feb 4, 2021, 9:51 PM IST

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर विधानभवनात येऊन राजीनामा दिला आहे. लवकरच त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर नियुक्तीची घोषणा केली जाऊ शकते. तसेच विधानसभेचे अध्यक्ष पद शिवसेनेला देऊन काँग्रेस आपल्या पदरात एक मंत्री पद मिळवू शकते. या मंत्रीपदावर पटोले यांची नियुक्ती केली जाऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पटोले यांचा राजीनामा -

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून पटोले हे काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होतील अशी चर्चा सुरू होती. काल दिल्लीत १० जनपथ येथे राहुल गांधी यांची पटोले यांनी भेट घेतल्यानंतर सगळ्या घडामोडींना वेग आला होता. अखेर आज पटोले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर विधानभवनात येऊन राजीनामा दिला आहे. लवकरच त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर नियुक्तीची घोषणा केली जाऊ शकते.

हेही वाचा -विधानसभा अध्यक्ष दिल्लीतून ठरवला जाईल - अस्लम शेख

कोण आहेत नाना पटोले -

नाना पटोले विदर्भातील एक बहुजन समाजाचे आक्रमक नेते असून, १९९९ पासून काँग्रेस पक्षाच्या सलोली मतदारसंघाचे सातत्याने ते प्रतिनिधित्व करतात. २००८ साली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर काँग्रेसच्या वरिष्ट नेत्यांशी वाद झाल्याने त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून २००९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून ते आमदार झाले आणि २०१४ ला भाजपच्याच तिकिटावर लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले होते. पण पंतप्रधान मोदी यांच्या शेतकऱ्यांविरोधी भूमिकेमुळे नाराज होऊन भाजपला सोडचिठ्ठी देऊन मोदींशी दोन हात करणारे पहिले पक्षातून बाहेर पडणारे नेते ठरले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून आले. याच वेळी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानं भाजपशी दोन हात करणारे पहिले नेते ठरल्याने नाना पटोले यांच्या गळ्यात विधानसभा अध्यक्ष पदाची माळ काँग्रेसने घातली.

मंत्र्यांवर एक नवी छाप -

एक वर्षाहून अधिक काळ विधानसभा अध्यक्ष असताना नाना पटोले यांनी आपल्या कार्यकाळात बऱ्याचदा त्यांच्या आक्रमक भूमिकेने मंत्र्यांवर एक नवी छाप पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच या पदावर असताना पक्ष संघटनेत अधिक काम करण्यासाठी आपण पूर्णपणे सक्षम असून ती संधी मिळत नसल्याने त्यांनी बऱ्याचदा उघड नाराजी जाहीर केली होती. अखेर त्यांची प्रदेश अध्यक्ष पदावर वर्णी लागणार असल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

हेही वाचा -नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

नवा अध्यक्ष कोण?

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. नवीन अध्यक्ष निवड होईपर्यंत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. येत्या अधिवेशनात नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. महाविकास आघाडी स्थापन झाली असताना किमान समान कार्यक्रम राबविण्यात आला आहे. यामध्ये विधानसभा अध्यक्ष पद हे काँग्रेसकडे आहे. त्यामुळे काँग्रेसचाच विधानसभा अध्यक्ष झाल्यास अमीन पटले - मुंबादेवी मतदार संघ, सुरेश वरपूरकर - पाथरी मतदार संघ, संग्राम थोपटे - भोर मतदार संघ यांची नावं चर्चेत आहेत.

अध्यक्ष पद काँग्रेसकडेच राहणार?

किमान समान कार्यक्रम अंतर्गत स्थापन झालेल्या सरकारमध्ये काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्ष पद आणि काही मंत्री मंडळातील खाती देण्यात आलीत. परंतु, नाना पटोले यांना मंत्रिपदाची अपेक्षा असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेसच्या गोटातील मंत्रिपदाची आणखी खाती उरलेली नाहीत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीशी चर्चा करून विधानसभा अध्यक्ष पद इतर पक्षाला देऊन मंत्रीमंडळात एक पद मिळवलं जाऊ शकतं. पण आता आगामी काळात या सगळ्या संदर्भात नेमकं चित्र स्पष्ट होईल.

बूथ एजंट केलं तरी बूथ सक्षम करेन -

पदाचा राजीनामा दिलानंतर नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडली, यापुढे देखील शेतकऱ्यांसाठी झटत राहीन. शेतकऱ्यांमध्ये या 3 कायद्यासंदर्भात जनजागृती करेन, त्यासाठी रान पेटवणार असल्याचं नाना पटोले म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details