मुंबई -दहा मार्च नंतर सरकारमध्ये काय बदल होतील ते दिसतीलचं असे वक्तव्य पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. मुंबईत आज काँग्रेसच्या दादर येथील प्रदेश कार्यालयात होणाऱ्या बैठकीआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole on changes in maharashtra government ) यांनी हे वक्तव्य करून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ केली आहे.
हेही वाचा -Shiv Sena Press : PMC बँक घोटाळ्याप्रकरणी किरीट आणि निल सोमैयांना अटक करा; संजय राऊत कडाडले
दहा मार्च नंतर नेमके राज्य सरकारमध्ये काय बदल होणार? किंवा काँग्रेसकडे असलेल्या मंत्रिपदांपैकी किती चेहरे बदलणार याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. काल 15 फेब्रुवारी रोजी गोंदियामध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान नाना पटोले यांनी 10 मार्च नंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये बदल होतील, असे वक्तव्य केले होते.
सरकार पाडण्यासाठी दबाव आणला जातोय
महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेकडून दबाव आणला जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. हा मुद्दा घेऊन आम्ही जनतेसमोर जाऊ, असे नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हंटले. किरीट सोमैया यांनी आतापर्यंत लावलेल्या आरोपानंतर एकही आरोप आतापर्यंत सिद्ध झालेला नाही, असे नाना पटोले यांनी यावेळी आवर्जून सांगितले. तसेच, केंद्र सरकारने आता डिफेन्सची 75 हजार एकर जमीनही विकायला काढली आहे. त्यांना देशाच्या सुरक्षेबाबत काय देणे घेणे, असा टोलाही नाना पटोले यांनी यावेळी केंद्र सरकारला लगावला.