मुंबई -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा नाना पटोले यांनी आज प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे हातात घेताच काँग्रेस पक्षाला राज्यात नवचैतन्य देऊन पक्षाला राज्यात एक नंबरचा पक्ष बनवू असा त्यांनी केला आहे. मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात जंगी कार्यक्रम करत नाना पटोले यांनी पदभार स्वीकारला. यावेळी मंचावर महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, काँग्रेसचे मंत्री वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, अमित देशमुख, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, अशोक चव्हाण, अस्लम शेख सहित काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे, नसीम खान आणि काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, संपत कुमार, सोनल पटेल, यांच्यासह काँग्रेसचे आमदार, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, सर्व सेल आणि फ्रंटलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आझाद मैदानातील काँग्रेस मेळावा 'मोदी सरकार चले जाव" चा ठराव - ऑगस्ट क्रांती मैदानाला ऐतिहासिक महत्त्व आहे. "अंग्रेज चले जाव" चा नारा या मैदानातून देण्यात आला होता. तर मैदानाच्या शेजारी असलेल्या तेजपाल हॉलमध्ये 1885 ला काँग्रेस पक्षाचा ठराव करण्यात आला होता. त्याच प्रमाणे आज काँग्रेस नेत्यांनी ऐतिहासिक हॉलमध्ये "मोदी सरकार चले जाव"चा ठराव मांडून तो पास करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
काँग्रेसचे पक्षाला गावागावात पोहोचवणार- पटोले
यावेळी भाषण करताना नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत मोदी सरकार शेतकरीविरोधी सरकार आहे म्हणून आपण खासदारकीचा राजीनामा दिला असल्याचा पुर्नरुच्चार त्यांनी केला. तसेच प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदरी घेऊन काँग्रेस पक्ष गावागावात पोहोचवून काँग्रेस पक्षाला पुनः एक नंबरचा पक्ष महाराष्ट्रात बनवू असा निश्चय त्यांनी केला. मोदी सरकारने देशाच्या संपत्ती विकायला काढली असून ही सर्व संपत्ती काँग्रेसने देशासाठी उभी केल्याची आठवण नाना पटोले यांनी यावेळी करून दिली. तर मोदी हे नटसम्राट असून शेतकऱ्यांना मरण्यासाठी त्यांनी काळे कृषी कायदे आणले असल्याच यावेळी ते म्हणाले. तर आपल्या नंतर प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा नाना पटोले सारख्या आक्रमक नेत्यांकडे दिली जात असून आपल्याला त्याचे समाधान आल्याच मत माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मांडले. कठीण काळात आपल्याला ही जबाबदारी मिळाली असून त्या जबाबदारीला न्याय देण्याचा आपण पूर्ण प्रयत्न केला. तसेच राज्याचे महसूल मंत्री पदही आपल्याकडे असल्याने प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी इतर कोणाला तरी देण्यात यावी, अशी मागणी आपण गेल्या काही महिन्यांपासून पक्षश्रेष्टीकडे करत होतो, असा खुलासा त्यांनी यावेळी आपल्या भाषणातून केला.
काँग्रेस कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्या -
नाना पटोले यांच्या पदग्रहण कार्यक्रमाला राज्यभरातून काँग्रेस कार्यकर्ते आले होते. दुपारच्या वेळेला असलेल्या या कार्यक्रमाला नियोजित वेळेवर न करता आल्याने दुपारपासून नेते मंडळींची वाट पाहत आलेला काँग्रेस कार्यकर्ता कंटाळला. संध्याकाळी निवनिर्वाचित प्रदेशाध्यक्षांच्या भाषणावेळी तर नेत्यांनी स्टेज भरलेला होता आणि सभामंडपातील खुर्च्या रिकाम्या असल्याची स्थिती पाहायला मिळाली.