मुंबई -महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशात कोरोना परसला असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ( Modi Said Congress Spread Corona ) होते. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी माफी मागावी यासाठी काँग्रेसच्यावतीने राज्यभर आंदोलन सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात ( Congress Protest Fadnavis Home ) आले. मुंबईकरांची गैरसोई होऊ नये म्हणून आंदोलन तात्पुरते मागे घेत आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राची माफी मागेपर्यंत आंदोलन सुरु राहिल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ( Nana Patole On Modi ) दिला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, शिवरायांच्या विचारांचा अपमान केला असून भाजपाने त्यांना पाठिंबा दिला आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागितलीच पाहिजे ही आमची मागणी आहे. यासाठी आम्ही आज मुंबईत आंदोलन केले. काँग्रेस अहिंसावादी आहे, हिंसावादी नाही. आम्हालाही गुंडगिरी करता येते पण ही आमची संस्कृती नाही. आम्हाला संदेश द्यायचा होता तो आम्ही दिला. परंतु, भाजपाने आपला खरा चेहरा मुंबई आणि महाराष्ट्राला दाखवला आहे.
मोदींच्या माध्यमातून महाराष्ट्र बर्बाद झाला तरी चालेल पण मोदींचे समर्थन करु, अशी भाजपाची वृत्ती आहे. भाजपासाठी नरेंद्र मोदी देशापेक्षा मोठे असतील आणि देवेंद्र फडणवीस त्यांना महाराष्ट्रापेक्षा मोठे वाटत असतील पण आमच्यासाठी देश, महाराष्ट्र व महाराष्ट्राची अस्मिता महत्वाची आहे. भाजपाने भाडोत्री लोकं उतरवत रस्त्यावर गर्दी केली. त्यांच्यामुळे मुंबईकरांना आज त्रास सहन करावा लागला. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून आजचे आंदोलन आम्ही तात्पुरते मागे घेत आहोत. पण हे आंदोलन सुरुच ठेवण्याची आमची भूमिका कायम आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.