मुंबई -पेगॅसस प्रकरणी ( Pegasus Snooping ) न्यूयॉर्क टाईम्सने ( NYT report Pegasus ) नरेंद्र मोदी सरकारचा खोटेपणा उघड केला आहे. मोदी सरकारने संसद, सर्वोच्च न्यायालय व जनतेला पेगॅसस प्रकरणी वारंवार खोटी माहिती देऊन फसवणूक केली आहे. न्यूयॉर्क टाईम्समुळे सत्य उघड झाले असून मोदी सरकारला आता सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही, त्यांनी तात्काळ राजीनामा दिला ( Nana Patole Demand Narendra Modi Resign ) पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी केली आहे.
'सरकारने जनतेला खोटी माहिती दिली' -
मोदी सरकारने २०१७मध्ये इस्रायल दौऱ्यावेळी क्षेपणास्त्र प्रणालीबरोबरच पेगॅसस हे स्पायवेअरही खरेदी केले होते. हा करार २ अब्ज डॉलरचा होता. दोन्ही देशांची शस्त्रास्त्रे आणि इंटेलिजेंस गियर पॅकेज खरेदी करण्यावर सहमती झाली होती. यातच पेगॅसस आणि क्षेपणास्त्र प्रणालीचाही समावेश होता. पेगॅससप्रकरणी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. संसदेत काँग्रेस व विरोधी पक्षांनीही या विषयावर सरकारला प्रश्न विचारले होते; परंतु मोदी सरकारने याचा साफ इन्कार केला होता. पेगॅससची खरेदी ही फक्त दोन देशातच केली जाते, असे इस्त्राईलने स्पष्ट केले होते. त्यावरूनच हे हेरगिरी तंत्रज्ञान सरकारने किंवा सरकारच्यावतीने कोणी खरेदी केले का, असा विरोधी पक्षांचा सरकारला थेट सवाल होता. परंतु मोदी सरकारने संसद, सुप्रीम कोर्ट व भारतीय जनतेला खोटी माहिती दिली, त्यांची दिशाभूल केली, हे आता स्पष्ट झाल्याचे पटोले यांचे म्हणणे आहे.