मुंबई -मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव ( Yashwant Jadhav IT Enquiry ) यांची आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली होती. तसेच या चौकशीनंतर त्यांच्या संपत्तीवरदेखील आयकर विभागाने टाच आणली. मात्र, यशवंत जाधव यांच्या डायरीमधून मातोश्रीला ( Yashwant Jadhav Dairy Suspicious Transactions ) दोन कोटी रुपये आणि 50 लाखाचे घड्याळ दिले असल्याची नोंद समोर आली असल्याची माहिती मिळत आहे. अशी माहिती समोर येणं म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेला बदनाम करण्याचा कट असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole Critisized BJP ) यांनी केला आहे.
काय म्हणाले नाना पटोले - परमबीर सिंह आणि सचिन वाझे प्रकरणांमध्ये काय झाले, हे सर्वांना माहित आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या चौकशी करत आहेत. त्याबाबत संशय निर्माण होतो आहे. हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असून, केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करत असल्याचा पुनरुच्चार नाना पटोले यांनी दादर येथील प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केला.
'सोमैयांनी लोकांचे मनोरंजन थांबवावे'- परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टवर हातोडा घेऊन तोडण्यासाठी किरीट सोमैया दापोलीला निघाले. किरीट सोमैया बेछूट कोणावरही आरोप करतात. याआधीही त्यांनी कृपाशंकर सिंह, नारायण राणे यांच्यावर आरोप केले होते. मात्र, या नेत्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यात आला. या नेत्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाल्यानंतर ते गंगा नहाले का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. तसेच किरीट सोमैया आणि भारतीय जनता पक्षाने आता असे लोकांचे मनोरंजन थांबवावे, असा टोलाही त्यांनी लगावला.