मुंबई -देशामध्ये सध्या महागाई, बेरोजगारी ( Inflation And Unemployment In India ) असे अनेक प्रश्न ज्वलंत आहेत. मात्र, या प्रश्न डावलण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून धर्माबाबत ( BJP Religious Politics ) द्वेष पसरवला जात आहे. मात्र महागाईच्या विरोधात काँग्रेस आक्रमकपणे जनतेचे प्रश्न मांडत राहील, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole Criticized BJP ) यांनी दिला आहे. आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपला इशारा दिला. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखंड भारताचे नेमकं व्हिजन काय, हे सर्वांसमोर ठेवावे. भारताला वेगळं करण्याचं काम त्यांनी करू नये, असा टोलाही त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लगावला.
मोदी सरकारने एकही कोळसा खाण काढली नाही -सध्या देशावर आणि राज्यावर अभूतपूर्व वीज टंचाईचे संकट आहे. केंद्र सरकारने स्वतः राज्यांना कोळसा खरेदी करण्याचं सांगितलं असल्यानेच केंद्र सरकारकडे कोळसा नसल्याचं यातून स्पष्ट होते आहे. वीज टंचाईबाबत सध्या देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली. त्याबाबत भाजपने जनतेला अंधारात ठेवू नये. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी एकही कोळसा खाण खरेदी केली नसल्याची आठवणही नाना पटोले यांनी केंद्र सरकारला करून दिली.
काँग्रेस मंत्र्यांची आढावा बैठक -काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा मुंबई दौरा लवकरच होणार असून अद्याप तारीख ठरलेली नाही. मुंबईत असताना भेटी संदर्भातचे निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना दिले. तर, ते नक्की त्यांची भेट घेतील, असेही नाना पटोले यावेळी म्हणाले. तसेच राहुल गांधी मुंबईत येण्याआधी मंगळवारी 19 फेब्रुवारीला सर्व काँग्रेस मंत्र्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर बोलवली आहे. या बैठकीतून काँग्रेस मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.