मुंबई -राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण होत असताना सध्या राज्यामध्ये जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीवरून काँग्रेसच्या (Maharashtra Congress) गोटात अस्वस्थता निर्माण झालेली आहे. या अगोदरसुद्धा काँग्रेसने बरीच वर्ष राज्यात सरकार स्थापन करून त्याचा अनुभव घेतलेला आहे. पण विभिन्न टोकाचे, विचारधारेचे पक्ष एकत्र आल्यानंतर सध्या जी काही परिस्थिती काँग्रेस अनुभवत आहे त्या दृष्टीकोनातून येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीसाठी ही परिस्थिती काँग्रेसला घातक ठरू शकते. म्हणूनच काँग्रेसने आता आपल्या परीने जनतेच्या प्रश्नावर हालचाली करायला सुरुवात केली आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेस अस्वस्थ? - सध्या राज्यात धार्मिक विषयावरून जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावरून विशेषतः काँग्रेस पक्षात नाराजी आहे. वाढती महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विजेचा प्रश्न, इंधनाचे वाढते दर, वाढती बेरोजगारी यासारख्या विविध प्रश्नावर काँग्रेसने आतापर्यंत राज्यात विविध आंदोलने केली. विशेष करून वाढत्या महागाईच्या प्रश्नावर काँग्रेस केंद्र सरकारच्या विरोधात मागील चार महिन्यांपासून मुंबईभर आंदोलन करत आहे. परंतु सध्या राज्यात खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या हनुमान चालीसा पठण करण्यावरून, तसेच मशिदीवरील भोंगे यावरून जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावरून जनतेच्या हिताचे प्रश्न बाजूला लोटले गेले असल्याचा अंदाज काँग्रेस पक्षाला आला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आत्ताच्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे जरी राज्याचा गाडा हाकत असले तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस त्याचा पुरेपूर फायदा करून घेत आहे. अशी मनोधारणा काँग्रेस नाही तर शिवसेनेच्या आमदारांची सुद्धा झाली आहे. त्याबाबत या अगोदर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी दोन्ही पक्षांमध्ये दिसून आली. काँग्रेस आमदाराच्या शिष्टमंडळाने तर या संदर्भामध्ये काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांची सुद्धा भेट घेतली होती. राज्यात सध्या सत्तेचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात होत असून कॉंग्रेस या महाविकासआघाडीत घटक पक्ष असूनही ते यामध्ये फार मागे असल्याचे चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते तसेच आता कार्यकर्तेसुद्धा महाविकास आघाडीमध्ये त्यांची कोंडी होत असल्याचे बोलले जात आहे.