मुंबई -राज्यात ९३ नगरपंचायतीतील ३३६ जागांसाठी (Nagar Panchayat Result 2022 ) मंगळवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सुरू झाली. आतापर्यंत आलेल्या निकालांमध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळताना दिसत असलं तरी, वैयक्तिक रित्या भाजप हा नंबर एकचा पक्ष आहे. त्याचबरोबर ३० नगरपंचायतीत भाजपचे वर्चस्व राहिलेलं आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. मुंबईत प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भंडारा- गोंदियात भाजपचे वर्चस्व -
भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे वर्चस्व राहिलेले आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. गोंदिया पूर्णपणे भाजपकडे आलेला असून भंडाऱ्यात सुद्धा भाजपचे वर्चस्व राहील असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा येथे दारुण पराभव झाल्याचंही त्यांनी म्हटलेले आहे. तर शिवसेना तिसऱ्या ते चौथ्या क्रमांकावर गेलेली आहे. त्याचबरोबर वैभववाडी, दोडामार्ग, मुरबाड, देवळा, साखरी, अकोला, हिंगणा, बीड यामध्ये भाजपला मोठ्या प्रमाणामध्ये यश आल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना खुर्चीवरून टोमणा..
"राजाने ठरवलंय खुर्ची उबदार आहे तर पक्षाची वाट लागली तरी चालेल"... असा टोमणा चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षरीत्या लगावला आहे. राज्यात आज ज्या पद्धतीचे निकाल सामोरे आलेले आहेत ते पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ यश यामध्ये मिळालेले दिसून आले आहे. त्याचबरोबर काँग्रेसनेही बऱ्यापैकी यश संपादन केलेले आहे. परंतु या महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेची पिछेहाट होताना दिसत आहे. याविषयी चंद्रकांत पाटील यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, "जर राजाने ठरवलेलं असेल की खुर्ची इतकी उबदार आहे, तर पक्षाची वाट लागली तरी चालेल!" असा टोमणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावत पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला टार्गेट केले आहे.
महाविकास आघाडीमध्ये बेबनाव -
महाविकासआघाडी मध्ये बेबनाव असल्याचे वारंवार समोर आलेले आहे. आता सुद्धा ठाणे, सांगोला, कोरेगाव येथे महाविकासआघाडी नेत्यांमध्ये एक वाक्यता नसल्याने तेथे सुद्धा महाविकास आघाडीत बेबनाव असल्याचे समोर आलेले आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. याचा फटका विशेष करून शिवसेनेला बसणार हेही सांगायला चंद्रकांत पाटील विसरले नाहीत.
ओबीसी समाज महाविकास आघाडीवर नाराज -
ओबीसी आरक्षणाचा राजकीय फटका हा महाविकास आघाडी सरकारमुळे बसलेला आहे हे आता ओबीसी जनतेला पूर्णपणे समजून चुकले असून जनतेने याबाबत आता महाविकास आघाडी सरकारला फटका देण्याचे ठरवले आहे असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. मंगळवारी झालेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा ओबीसी समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला नाकारलेले आहे, असं सांगत या निवडणुकीमध्ये बहुतांश ठिकाणी भाजपने ओबीसी उमेदवार दिले. ओपन कॅटेगिरीमधून सुद्धा उमेदवार द्यायचे असून तसं न करता त्यांनी ओबीसी समाजातून उमेदवार दिल्याने भाजप ओबीसी समाजाच्या पाठीशी उभा आहे, असंही चित्र जनतेसमोर गेल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.