मुंबई -यंदा 15 ऑगस्टला देशाला स्वातंत्र मिळून 75 वर्ष होत आहे. त्यानमित्त सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य सेवेत काम केलेल्या महान व्यक्तींशी आपण चर्चा करणार आहोत. आतापर्यंत मोतिबिंदूसाठी 587 शिबिरे, 198 ऑपरेशन शिबिरे, 1 लाख 30 हजार ऑपरेशन व साडेतीन लाख मोतीबिंदूचे ऑपरेशन करणारे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने ( dr tatyarao lahane ). डॉ. लहाने हे मागील वर्षी प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर डॉ. लहाने यांनी स्वत:ला लोकांच्या सेवेसाठी झोकून घेतलं. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीबद्दल डॉ. लहाने यांच्याशी 'ईटिव्ही भारत'ने संवाद साधला आहे.
देशात स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असताना वैद्यकीय क्षेत्रामध्ये स्वातंत्र्यानंतर कशा पद्धतीचे बदल झाले आहेत, असे आपणासं वाटते?
अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरे करत आहोत, ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. वैद्यकीय शिक्षण सेवेचा विचार केला तर यात खूप मोठे अमुलाग्र असे बदल व प्रगती झाली आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात देशात फक्त तीन वैद्यकीय महाविद्यालय होती. त्यामध्ये सुद्धा अर्धे शिक्षण येथे होत असे, अर्धे शिक्षण इंग्लंडला होत असे. आज आपल्याकडे 581 वैद्यकीय महाविद्यालय असून त्यातून 86000 डॉक्टर दरवर्षी तयार होत आहेत. दरवर्षी पीजीसाठी 56 हजार प्रवेश घेतले जात आहेत. लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 1000 लोकसंख्येमागे 1 डॉक्टर असून, ही संख्या फार कमी आहे. तरीसुद्धा सर्व प्रकारच्या सुपर स्पेशालिटीमध्ये हृदय, किडनी बदलणे असेल यामध्ये प्रगती होताना दिसत आहे. आरोग्य सेवेमध्ये जे काही राष्ट्रीय कार्यक्रम आहेत अस्थमा, दमा, एचआयव्ही, अंधत्व निवारण, फॅमिली प्लॅनिंग या सर्वांसाठी राष्ट्रीय स्तरावर निधी उपलब्ध करून दिला जात आहे. आयुष योजनेमुळे भारतात लोकांना ज्या अडीअडचणी येत होत्या, त्यादूर झाल्या आहेत. बऱ्याच वेळेस पैसे नसल्याने उपचार होत नव्हते. लोक शरीरावर आजार काढत असत, त्यामुळे आता आयुष योजनेचा मोठा फायदा जनतेला होत आहे. त्याचबरोबर राज्याचे सांगायचं झालं तर महात्मा फुले योजनेअंतर्गत योजनेत 982 आजारांचा समावेश असल्याकारणाने त्याचा सुद्धा मोठा फायदा नागरिकांना होताना दिसत आहे, असे तात्याराव लहाने यांनी सांगितलं आहे.
आरोग्यरूपी अमृत देण्यात आपण यशस्वी झालो?
लोकांच्या आरोग्याची काळजी सर्वात महत्त्वाची आहे. कोरोनामध्ये देशात लॉकडाऊन करावे लागले. त्या परिस्थितीत देशात एक लाख अशी खाटांची संख्या वाढवण्यात आली. ऑक्सिजनची पूर्तता करण्यात आली. सर्व प्रकारच्या लॅब सुसज्ज करण्यात आल्या. लस निर्मिती करण्यासाठी विदेशी देशांना वर्षानुवर्षे लागतात. पण, आपण तीन ते दहा महिन्याच्या अंतरात लस तयार केली. या अनुषंगाने आपण आरोग्य क्षेत्रामध्ये प्रगत देशाची बरोबरी करत आहोत. आरोग्याच्या सोयी सुविधा अत्यंत योग्य पद्धतीने हाताळल्या जात आहेत. पॅरामेडिकलसाठी 19 प्रकारचे शिक्षण दिले जात आहे. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांवर आपल्याकडे उपाय होत आहेत. या कारणाने प्रगत देशांबरोबर भारताची मान जगात उंचावत आहे. आरोग्य शिक्षणाकडे लक्ष दिले जात असले तरी हृदय, किडनी, मधुमेह या आजारामध्ये हवीतशी प्रगती झाली नाही. आपल्या देशाला मधुमेहाची राजधानी म्हणतात. पण, हे मधुमेहाचे प्रमाण कमी करण्यासाठी योग्य वेळी तपासणी करणे गरजेचे आहे. मधुमेहात आजार दिसत नाही म्हणून तो वाढत जातो. या आजारावर प्रभावी उपाय केले तर आपल आयुष्य वाढू शकते. परंतु, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना या वर्षात आरोग्यरूपी अमृत देण्यात आपण यशस्वी झालो, असेही डॉक्टर तात्याराव लहाने म्हणाले.