मुंबई - कोरोनामुळे राज्यात गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कौशल्यांना बाधा आली आहे. विद्यार्थ्यांच्या वाचन आणि लेखनाच्या सवयी खंडित झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नव्याने शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना अक्षर ओळख करताना अनेक अडचणी येत असल्याने आता या विद्यार्थ्यांसाठी निपुण भारत मोहीम राबवली जात आहे. मात्र या मोहिमेंतर्गत राज्य सरकारच्या समग्र शिक्षण परिषदेने प्रथम या अशासकीय संस्थेच्या ( Pratham Organization ) माध्यमातून माझी ई शाळा ही संकल्पना ( My E School Project ) राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये 500 शाळांमध्ये राबवण्याबाबत सामंजस्य करार केला असल्याची माहिती प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी दिली आहे. तर सध्या पन्नास शाळांमध्ये थेट आणि 450 शाळांमध्ये प्रस्तावित मॉडेलद्वारे माझी ई शाळा हा कार्यक्रम राबविला जाणार असल्याची माहिती प्रथमचे प्रेम यादव यांनी दिली.
काय आहे माझी ई शाळा संकल्पना?या कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शालेय विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्याचा मानस आहे. दैनंदिन अध्यापनासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करून शिक्षण प्रक्रियेला चालना देण्यात येणार आहे. डिजिटल क्लासच्या माध्यमातून शिक्षकांद्वारे ई-लर्निंगचा अधिकाधिक वापर व्हावा हा सकारात्मक दृष्टिकोन तयार करण्याचा मानस आहे. प्रथम इन्फोटेक फाउंडेशनच्या संकल्पनेतून डिजिटल साक्षर ई लर्निंग प्लॅटफॉर्म ऑनलाइन यामध्ये, ॲप, वेब एप्लीकेशन आणि युट्युब यांचा समावेश आहे. ऑफलाइनमध्ये टेलिव्हिजन प्रोजेक्टर अँड्रॉइड स्टिक संगणक आणि टॅबलेट हे शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. बालभारतीवर आधारित इयत्ता पहिली ते दहावीतील शालेय अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या गतीने शिकण्यास मदत करणार आहे. या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्रात ग्रामीण भागातील डिजिटल डिव्हाइड कमी करण्याचा प्रयत्न आहे.
कशी होणार अंमलबजावणी?प्रत्येक तालुक्यामध्ये दोन ते तीन आदर्श शाळांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम इन्फोटेकद्वारे या शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम उभारणार आहेत. सध्याच्या पारंपारिक क्लासरूमचे डिजिटल क्लासरूममध्ये रूपांतर करण्यासाठी हार्डवेअर एसडी कार्डसह प्रोजेक्टर कीबोर्ड माऊस रिमोट यांचा वापर करण्यात येणार आहे. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून डिजिटल साक्षर या कार्यक्रमात अंतर्गत पहिली ते दहावी बालभारतीचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.