महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Legislative Council Election : विधान परिषदेत राज्यसभेची पुनरावृत्ती: महाविकास आघाडीची कसोटी लागणार

संख्याबळ तुलनेत कमी असले, तरी भाजपने महाविकास आघाडीला कामाला लावले आहे. विधान परिषदेत भाजपच्या पाच जागा रिक्त होणार आहेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन जागा रिक्त होत आहेत. विधानपरिषदेची निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 27 मतांची आवश्यकता आहे. भाजपकडे 113 संख्याबळ असून यातील चार आमदार सहज निवडून जातील.

Legislative Council Election
विधान परिषद निवडणूक

By

Published : Jun 8, 2022, 11:28 AM IST

मुंबई -राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार देत, निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. महाविकास आघाडी भाजपला शह देण्यासाठी जोरदार व्यूहरचना आखत आहे. मात्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत राज्यसभेची पुनरावृत्ती होणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची कसोटी लागणार आहे.

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील एकूण सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. शिवसेनेने संजय राऊत, संजय पवार, भाजपकडून पियुष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि तिसऱ्या पसंतीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रफुल्ल पटेल आणि उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे युवा नेते ईम्रान प्रतापगढी हे उमेदवार आहेत. राज्यसभेच्या प्रत्येक जागेवर निवडून येण्यासाठी 42 मते गरजेचे आहेत.

सत्ताधारी महाविकास आघाडीकडे 169 आमदारांचे पाठबळ आहे. भाजपकडे 113 मते आहेत. दोन्ही पक्षानी चौथ्या जागेसाठी अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रयत्न सुरू केले असून मते फुटू नयेत, यासाठी आपापल्या पक्षाच्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे. निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा अपक्षांचा भाव वधारत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

अपक्ष आमदारांना पुन्हा भाव -संख्याबळ तुलनेत कमी असले, तरी भाजपने महाविकास आघाडीला कामाला लावले आहे. विधान परिषदेत भाजपच्या पाच जागा रिक्त होणार आहेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन जागा रिक्त होत आहेत. विधानपरिषदेची निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 27 मतांची आवश्यकता आहे. भाजपकडे 113 संख्याबळ असून यातील चार आमदार सहज निवडून जातील. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून जातील. काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येईल. तरीही पहिल्या पसंतीची मते महाविकास आघाडीकडे शिल्लक राहतील. मात्र काँग्रेसला दुसरा उमेदवार द्यायचा झाल्यास केवळ 12 मतांची तजवीज करावी लागेल. ही संधी ना भाजप सोडणार, ना महाविकास आघाडी सरकार. विशेष म्हणजे, भाजपच्या विधान परिषदेतील जागा कमी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार जोर लावण्याची शक्यता आहे. छोटे आणि अपक्ष आमदारांना यावेळी साकडे घालावे लागतील. राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष आमदारांनी महाविकास विकास आघाडीला साथ दिल्यास भाजपचा सुपडा साफ होण्याची शक्यता आहे.

विधानपरिषदेप्रमाणेच होणार राज्यसभेची निवडणूक -राज्यसभा निवडणुकीच्या एक दिवस अगोदर विधानपरिषदेचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 जून आहे. त्यामुळे धावपळ वाढली आहे. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न केले. महाराष्ट्रात आजपर्यंत सहमतीचे राजकारण केले जायचे. परंतु, भाजप आणि शिवसेना सहाव्या जागेवर ठाम राहिल्याने निवडणूक होत आहे. सहा जागांसाठी सातच उमेदवार रिंगणात असून विधानपरिषदेतील भाजप माघार घेण्याची शक्यता धूसर आहे. शिवाय राज्यसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने रस्सीखेच सुरू आहे. तसा प्रकार विधानपरिषदेत होऊ शकतो. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत याचे परिणाम मोठ्या प्रमाणात होताना दिसतील, असे भाकीत राजकीय विश्लेषण विवेक भावसार वर्तवतात.

या आमदारांचा संपणार कार्यकाळ -भाजपचे प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सुजितसिंह ठाकूर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे या आमदारांची मुदत संपत आहे. तर रामनिवास सत्यनारायण सिंह यांचे निधन झाल्याने जागा रिक्त झाली आहे. शिवसेनेकडून सुभाष देसाई, दिवाकर रावते आणि राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर, संजय दौंड यांचीही मुदत संपत आहे. तर काँग्रेसचा एकही उमेदवार निवृत्त होत नाही. मात्र या जागेवर कुणाला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details