रायगड - मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मालवाहू टेम्पोला आग लागून त्यात एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली होती. सदर व्यक्तीचा टेम्पोच्या आगीत जळून मृत्यु झाला नसून त्याला जाळण्यात आल्याचे कटकारस्थान लक्षात येताच जळीतकांडाचा यशस्वी तपास करीत रसायनी पोलिसांनी खून करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहे. तर एकजण फरार असल्याचे समजते. सदर तपासात हा खून अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
कुटुंबीयांनी व्यक्त केला संशय -
मंगळवारी 12 ऑक्टोबर रोजी रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या एका माल भरलेल्या टेम्पोला आग लागल्याची माहिती मिळताच पोलिसांसह रेस्क्यू टीम, अग्निशमन दल, अपघातग्रस्तांच्या मदतीला तेथे पोहचले. आग आटोक्यात आणल्यानंतर लक्षात आले की टेम्पोच्या केबिनमध्ये एका व्यक्तीचा जळून अक्षरशः कोळसा झाला आहे. त्या मृतदेहाची ओळख पटवणे मोठे जिकरीचे काम होते. शेवटी गाडीच्या मालकाचा शोध घेतला असता मृत व्यक्ती हा सदाशिव संभाजी चिकाळे (रा. पुनावळे, ता मुळाशी, जि. पुणे) येथील असल्याचे पोलिसांना समजले. मयताची बातमी जेव्हा त्याच्या कुटूंबांला दिली तर त्यांनी सदाशिवचा खून झाला असेल असा संशय व्यक्त केला. त्याचे एका व्यक्ती बरोबर भांडण होते असे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवत सत्यता पडताळून पाहण्यासाठी रायगड पोलीस अधीक्षक अनिल दुधे यांच्या आदेशानुसार खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांनी सहा.पोलीस निरीक्षक बालवडकर, पीएसआय काळे, पोलीस नाईक विशाल झावरे, मंगेश लांगे, राहुल भडाळे यांच्या दोन टीम तयार केल्या आणि तपास पूर्ण केला.