मुंबई -मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क लावण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र त्यानंतरही मुंबईकर त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. ही दंडात्मक कारवाई मुंबई पोलीस दल, वाहतूक पोलीस यांच्यासमवेत संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.
‘विना मास्क’ आढळून आल्यास आता पालिकेसोबतच पोलिसही करणार कठोर कारवाई - मुंबई कोविड चाचणी न्यूज
दुकानदार, विक्रेते, दुकान-उपहारगृहे इत्यादी ठिकाणी काम करणारे विक्रेते व कर्मचारी, मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक इत्यादींवर देखील ‘विना मास्क’ बाबत आवश्यकतेनुसार संबंधित कलमांन्वये कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. कोविडविषयक वैद्यकीय चाचणी करताना ती ‘आरटीपीसीआर चाचणी’ व ‘रॅपिड ऍन्टीजेन चाचणी’ ची संख्या नियोजनपूर्वक वाढविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेत.
महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनात महापालिकेच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना महापालिका आयुक्तांनी वरील निर्देश दिले आहेत. या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, महापालिकेचे सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त, महापालिका रुग्णालयाचे अधिष्ठाता, सार्वजनिक आरोग्य खात्यातील वैद्यकीय अधिकारी आणि महापालिकेच्या विविध खात्यांचे अति वरिष्ठ अधिकारी आणि मुंबई पोलिस दलाच्या आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून उपायुक्त शहाजी उमप उपस्थित होते.
या बैठकी दरम्यान ‘विना मास्क’ विषयक दंडात्मक कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांचे सहकार्य घेऊन दंड वसूल करावा. तसेच, नगरसेवकांचे सहकार्य घेण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यासाठी संयुक्त कारवाई आराखडा बनवण्याचे निर्देश पालिकेच्या 24 विभागातील अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिले आहेत. आतापर्यंत ४० हजार पेक्षा अधिक नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, यापोटी रुपये १ कोटी ५ लाखांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आल्याची माहिती या बैठकीत पालिका अधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिली.
यांच्यावर कारवाई -
दुकानदार, विक्रेते, दुकान-उपहारगृहे इत्यादी ठिकाणी काम करणारे विक्रेते व कर्मचारी, मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक इत्यादींवर देखील ‘विना मास्क’ बाबत आवश्यकतेनुसार संबंधित कलमांन्वये कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
वैद्यकीय चाचण्या व्यापकतेने करण्याचे निर्देश -
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील कोविड विषयक वैद्यकीय चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज लक्षात घेऊन सर्व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या विभागातील दैनंदिन चाचण्यांची संख्या नियोजनपूर्वक वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. कोविडविषयक वैद्यकीय चाचणी करताना ती ‘आरटीपीसीआर चाचणी’ व ‘रॅपिड ऍन्टीजेन चाचणी’ या दोन प्रकारे प्रामुख्याने केली जाते. या दोन्ही प्रकारच्या चाचण्यांची संख्या नियोजनपूर्वक वाढविण्याचे निर्देश दिलेत. सध्या महापालिका क्षेत्रात दोन्ही प्रकारच्या चाचण्या मिळून दररोज १४ ते १५ हजार चाचण्या केल्या जात असून ही संख्या २० हजारापर्यंत वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.