मुंबई - रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास कायद्याने मनाई करण्यात आली आहे. मात्र, नियम धाब्यावर बसवून फेरीवाल्यांनी आपले बस्तान कायम ठेवले आहे. रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर आता कारवाई केली जाणार आहे. पालिका, रेल्वे आणि पोलिसांमार्फत आता संयुक्त कारवाई सुरू करण्यात येणार आहे. याबाबत मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या कारवाईचा आढावा घेण्यासाठी एक महिन्यांनंतर पुन्हा बैठक घेतली जाणार आहे.
कारवाई कायम ठेवणार
रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटर आणि शाळेपासून १०० मीटरच्या अंतरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मनाई करण्यात आली आहे. मात्र या नियमाकडे दुर्लक्ष करून फेरीवाले रेल्वे परिसरातील पदपथ, स्कायवॉक, पादचारी पूलावर सर्रास व्यवसाय करीत आहेत. मोकळ्या जागा अडवल्या जात असल्याने नागरिकांना कसरत करून चालावे लागते आहे. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर हे प्रमाण आणखी वाढले आहे. त्याचा फटका पादचारी आणि प्रवाशांना बसत आहे. परिणामी स्थानक परिसरात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढते आहे. रेल्वे प्रशासनामार्फत रेल्वे परिसरातील ही कारवाई केली जाते. मात्र, अपुऱ्या यंत्रणेमुळे गेल्या दोन वर्षांपासून ही कारवाई थंडावली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी मंगळवारी मुंबई महापालिका, रेल्वे, पोलिस अधिकारी, व्यापारी आणि फेरीवाला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती.