मुंबई - दिवसेंदिवस मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना रुग्णालये कमी पडू लागली आहेत. रुग्णालये कमी पडू लागल्याने पालिकेने मोकळ्या जागा, रिक्त असलेल्या वास्तूमध्ये कोरोना केअर सेंटर आणि रुग्णालय सुरू करण्यास पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून पालिकेने भायखळा पूर्व परिसरातील केंद्र सरकारच्या 'रीचर्डसन आणि क्रुडास' कंपनीच्या परिसरात महापालिका अभियंत्यांनी केवळ १५ दिवसात ३०० 'ऑक्सिजन बेड' सह १ हजार खाटांचे जम्बो फॅसिलिटी' कोविड उपचार केंद्र उभारले आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे पालिका प्रशासनाने कळविले आहे.
मुंबई पालिका अभियंत्यांनी उभारले १ हजार खाटांचे कोरोना उपचार केंद्र - भायखळा न्यूज
मुंबई पालिकेने भायखळा पूर्व परिसरातील केंद्र सरकारच्या 'रीचर्डसन आणि क्रुडास' कंपनीच्या परिसरात महापालिका अभियंत्यांनी केवळ १५ दिवसात ३०० 'ऑक्सीजन बेड' सह १ हजार खाटांचे जम्बो फॅसिलिटी' कोविड उपचार केंद्र उभारले आहे.
'कोरोनाबाधित रुग्णांवर अधिक प्रभावीपणे उपचार करता यावेत, यासाठी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील काही ठिकाणी 'जंबो फॅसिलिटी' अर्थात अधिक क्षमतेची उपचार केंद्रे यापूर्वीच रुग्ण सेवेत रुजू झाली आहेत. याच शृंखलेत आता भायखळा पूर्व परिसरात असणाऱ्या केंद्र शासनाच्या अखत्यारीतील 'रीचर्डसन आणि क्रुडास' कंपनीच्या परिसरात तात्पुरत्या स्वरूपातील एक मोठे उपचार केंद्र उभारण्यात येत आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिलेल्या निर्देशांनुसार आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात उभारण्यात येत असलेल्या या तब्बल १ हजार खाटांची क्षमता असलेल्या उपचार केंद्राच्या उभारणीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. हे उपचार केंद्र जून महिन्याच्या अखेरीस रुग्ण सेवेत दाखल होईल, अशी माहिती 'इ' विभागाचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी दिली आहे.