मुंबई -शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Statue of Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांचा गेट वे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमाजवळ पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा उभारल्यावर दहा महिन्यातच त्याचा रंग उडाला आहे. त्यामुळे या पुतळ्याची डागडुजी करणे. तसेच सभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करून सुशोभीकरण करण्यासाठी पालिका १६ लाख रुपये खर्च करणार आहे. यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कामाच्या प्रस्तावाला पालिकेची अंतिम मंजुरी मिळताच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
२३ जानेवारीला झाले पुतळ्याचे लोकार्पण -
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी निधन झाले. बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रासह देशभरात चांगलाच दरारा होता. त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण निरंतर होण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया, श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, रिगल सिनेमा समोरील वाहतूक बेटाच्या जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ९ फुट उंचीचा आकर्षक पूर्णाकृती पुतळा २ गवताचा मंच व ११ फुटी पोडीएम उभारण्यात आला. या पुतळ्याचे अनावरण बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजे २३ जानेवारी २०२१ रोजी करण्यात आले.
ऑक्टोबर महिन्यात रोषणाई -
बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्या दरम्यान विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कार्यक्रमानंतर ही रोषणाई काढल्याने पुतळा अंधारात असल्याचे दिसून येत होते. त्यासाठी पुतळ्यावर तसेच वाहतूक बेटावर महानगरपालिकेच्या फोर्ट येथील ए विभाग कार्यालयाच्या वतीने ऑक्टोबर महिन्यात कायमस्वरूपी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विद्युत रोषणाई करण्यासाठी ५० वॅटच्या फ्लड लाईटसह २४ वॅटचे वॉल वॉशरचा ठिकठिकाणी उपयोग करण्यात आला आहे.
१६ लाखांचा खर्च -
ऑक्टोबरमध्ये विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुतळ्याला पुष्पअर्पण करुन अभिवादन केले आणि विद्युत रोषणाईची पाहणी केली होती. एलईडी दिव्यांच्या झोतात उजळून निघालेला पुतळा, वाहतूक बेट पाहून मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले होते. हा पुतळा उभारून दहा महिने झाले आहेत त्यातच पुतळ्याचा रंग उडाला आहे. यामुळे पुतळ्याची डागडुजी आणि रोषणाई करण्यासाठी पालिकेने टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. पालिका या कामासाठी १६ लाख रुपये खर्च करणार आहे. टेंडरला चांगला प्रतिसाद लाभल्यास व प्रस्तावाला पालिकेची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील ३ महिन्यात सदर काम पूर्ण करण्यात येणार आहे.
हेही वाचा -Maharashtra Winter Session 2021 : कोणी म्हणतंय मुंबईत घ्या तर कोणी म्हणतंय नागपुरात, पेच कायम