मुंबई -मुंबईतील ३ लाख ४८ हजार ६७२ मालमत्तांपैकी तब्बल ७६ हजार ४२५ मालमत्तांमधील मैलापाणी ( sewage water ) पर्जन्यवाहिन्यांमध्ये, नद्या- नाल्यांमध्ये सोडले जाते. मुंबईतील जल वाहिन्यांमध्ये जाणारे हे मैले पाणी रोखण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने ( Mumbai Muncipal Corporation ) घेतला आहे. पर्यावरण रक्षणासाठी हा प्रकल्प राबवला जाणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पालिकेकडून सल्लागार नियुक्त केला जाणार आहे.
२० ठिकाणचा मैला खाड्यांमध्ये -
मुंबईतील मैलापाणी प्रक्रिया न करता थेट नदी-नाले, समुद्र अशा नैसर्गिक स्रोतांमध्ये सोडले जाते. हरित लवादाने याबाबत पालिकेला दंड ठोठावत सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पालिकेकडून मागील चार वर्षापासून याबाबत अभ्यास, उपाययोना करण्याच्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मालमत्तांमधून ३५ हजार ४४२ पर्जन्यवाहिन्यांमध्ये मैलापाणी सोडले जात असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणातून आढळून आले आहे. ४० हजार ७५६ मालमत्तांमधून मैला नाल्यांमध्ये सोडला जात आहे. शिवाय २०७ ठिकाणचा मैला थेट समुद्रात तर २० ठिकाणचा मैला खाड्यांमध्ये सोडला जातो.