मुंबई- मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार आहे. कोरोनाच्या प्रसारामुळे गेले पावणे दोन वर्षे शाळा बंद आहेत. मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने राज्य सरकारने १ डिसेंबरपासून इयता पाहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील शाळा सुरू करण्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने नियोजन केले असून येत्या दोन दिवसात शाळा सुरू करण्यासाठी सज्ज असतील अशी माहिती शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.
कोरोना आटोक्यात -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर कोरोना रुग्ण संख्या वाढली तसेच रुग्णांचा मृत्यू होऊ लागल्याने लॉकडाऊन लावण्यात आला. त्याचवेळी शाळाही बंद करण्यात आला. गेल्या पावणे दोन वर्षात कोरोना विषाणूच्या मुंबईत दोन लाटा येऊन गेल्या. या लाटा थोपवण्यास पालिकेला आणि सरकारला यश आले आहे. सध्या कोरोना आटोक्यात असल्याने अनेक निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून याआधी ग्रामीण भागात ५ वी च्या पुढील तर शहर विभागात ८ वी च्या पुढील शाळा सुरू करण्यात आल्या.
पालिकेची तयारी -
ग्रामीण भागात १ली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवी शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून विचारविनिमय सुरू होता. याबाबत आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. येत्या १ डिसेंबरपासून शाळा सुरू केल्या जाणार आहेत. राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे मुंबई महापालिकेने शाळा सूरु करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. ११५९ शाळांच्या सुमारे ५०० इमारती दोन दिवसांत सॅनिटायझेशन करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत मास्क, हात धुण्यासाठी साबण आणि गेटवर स्क्रिंनगची व्यवस्थाही केली जाणार असल्याची माहिती तडवी यांनी दिली.
सोशल डिस्टनसिंगचे पालन -
पालिकेच्या पहिली ते दहावीपर्यंतच्या एकूण ११५९ शाळा आहेत. यामध्ये २ लाख ९२ हजार ७८४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर खासगी अनुदानित ३९३ तर खासगी विनाअनुदानित ६६७ शाळा आहेत.पालिकेच्या शाळांमध्ये आठवी ते दहावीपर्यंतच्या वर्गात ७१ हजार ९२३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर पहिली ते सातवीपर्यंत सुमारे २ लाख २० हजार ८६१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेमध्ये सोशल डिस्टनसिंगचे पालन व्हावे म्हणून एका बाकावर एका विद्यार्थ्याला बसवले जाणार आहे. ज्यांना शाळेत येणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाणार आहे. शिक्षक व कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. ज्यांची तब्बेत ठीक नसेल आशा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत.
हेही वाचा -Param Bir Singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची ७ तास चौकशी