मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार व तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी मुंबईत गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे. आज रविवारी १९ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या श्रीगणेशाचे विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी विसर्जनस्थळी पालिकेने सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विसर्जनाला गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी पालिका सज्ज झाली आहे. तसेच विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी मुंबई पोलिसांनीही बंदोबस्त ठेवला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध -
मुंबईत गेल्या वर्षी (मार्च २०२०) पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. कोरोनाचा प्रसार असल्याने गेल्या वर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. यंदाही कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने राज्य सरकार व मुंबई महापालिकेने निर्बंध लागू केले. यामुळे भाविकांकडून उत्सव साधे पणाने साजरा करण्यात आला आहे. दीड, पाच आणि सात दिवसांच्या श्रीगणेशाचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडल्यावर आज अनंत चतुर्थीला दहा दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. हे विसर्जन सोमवारी पहाटे पर्यंत सुरू राहणार आहे.
पालिकेचे २५ हजार कामगार सज्ज -
मुंबई महापालिकेने दहा दिवसांच्या श्रीगणेश विसर्जनासाठी शहर व उपनगर येथील सर्व २४ विभागांमध्ये साधारणपणे २५ हजार कामगार, कर्मचारी, अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी यंदा देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे. यानुसार १७३ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे. आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे, फिरती विसर्जन स्थळे देखील कार्यरत असणार आहेत. या व्यतिरिक्त पालिका क्षेत्रातील ७३ ठिकाणी नैसर्गिक विसर्जन स्थळीही विसर्जनासाठी व्यवस्था असणार आहे. अशी माहिती उप आयुक्त हर्षद काळे यांनी दिली.
पालिकेने केलेली व्यवस्था-
मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, माहिम आदी चौपाट्यांसह विविध नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्थळी ७१५ जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी येणारे वाहन समुद्र किना-यावरील रेतीमध्ये अडकू नयेत, यासाठी ५८७ ‘स्टील प्लेट’ची व्यवस्था करुन तात्पुरते वाहन मार्ग तयार करण्यात आले आहेत. विविध ठिकाणी ३३८ निर्माल्य कलश, १८२ निर्माल्य वाहन, १८५ नियंत्रण कक्ष, १४४ प्राथमिक उपचार केंद्र, ३९ रुग्णवाहिका इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त १४५ स्वागतकक्ष, ८४ तात्पुरती शौचालये, ३ हजार ७०७ फ्लड लाईट, ११६ सर्च लाईट, ४८ निरीक्षण मनोरे आणि नैसर्गिक विसर्जन स्थळांच्या ठिकाणी ३६ मोटर बोट व ३० जर्मन तराफा इत्यादी सेवा-सुविधा व साधनसामुग्रींचीही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती हर्षद काळे यांनी दिली.
पर्यावरणपूरक मूर्तींचे घरीच विसर्जन करा -
कोरोनाच्या कालावधीत विसर्जनाच्या निमित्ताने होणारी गर्दी टाळण्यासाठी घरगुती गणेशाची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या-घरी बादलीत किंवा ड्रममध्ये करावे, असे आवाहन पालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
पोलीस यंत्रणा सज्ज -
विसर्जनादरम्यान काेणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत ४५ हजार पाेलीसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रक पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, होमगार्ड यांची मदत घेण्यात आली आहे. मुंबईतील ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलिसांची या उत्सवावर नजर असणार आहे. पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
याची घ्या काळजी -
- घरगुती गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीने जाऊ नये, विसर्जनासाठी जास्तीत-जास्त ५ व्यक्ती असाव्यात.
- सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाच्या मंडपात आरती केल्या नंतर १० कार्यकर्ते गणेश मूर्ती विसर्जन स्थळी आणून पालिका कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करतील. पालिका कर्मचारी या मूर्त्यांचे विसर्जन करतील.
- मंडपातील आणि विसर्जन करताना सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांनी ‘कोविड-१९’ प्रतिबंधक लसीचे डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेले असावेत.
- मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, सतत हातधुणे या कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन पालिकेने केले आहे.