मुंबई- निसर्ग चक्रीवादळामुळे मोठा पाऊस पडणार असून मुंबईत पाणी साचण्याची शक्यता आहे. २६ जुलै २००५ आणि त्यानंतर झालेल्या पावसात पाण्यात गाड्या अडकून त्यात नागरिकांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पावसामुळे पाणी तुंबून पाण्यात कार, जीप सारख्या गाड्या अडकल्यास व ऑटो लॉक सिस्टिम बंद पडल्यास सोबत काच फोडण्यासाठी एखादे साधन सोबत ठेवावे अशी सूचना मुंबई महापालिकेकडून करण्यात आली आहे.
२६ जुलै २००५ च्या अतिवृष्टी दरम्यान काही चारचाकी वाहनांच्या स्वयंचलित लॉक सिस्टिममध्ये पाणी गेल्यामुळे सदर यंत्रणा बंद पडली होती. परिणामी गाडीचे दरवाजे व खिडक्या उघडता न आल्याने काही नागरिकांचे दुर्दैवी मृत्यू झाले होते. गेल्या वर्षी २०१९ च्या पावसात देखील अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती, ज्यात दोन व्यक्तींचे दुर्दैवी मृत्यू झाले होते. ही बाब लक्षात घेऊन व अशी घटना टाळता यावी, यासाठी काही अत्यंत महत्वाच्या कारणासाठी चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून आपल्या वाहनात काच फोडता येईल, असे साधन ठेवण्याची सूचना महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.